ऑक्सिजनचा औद्योगिक वापर रोखण्यासाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:24 IST2021-05-09T04:24:49+5:302021-05-09T04:24:49+5:30

कोल्हापूर : कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची दिवसेंदिवस वाढत जाणारी मागणी पूर्ण करण्यासाठी ऑक्सिजनचा औद्योगिक वापर जिल्हा प्रशासनाने थांबवला आहे. तरीही ...

Committee to prevent industrial use of oxygen | ऑक्सिजनचा औद्योगिक वापर रोखण्यासाठी समिती

ऑक्सिजनचा औद्योगिक वापर रोखण्यासाठी समिती

कोल्हापूर : कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची दिवसेंदिवस वाढत जाणारी मागणी पूर्ण करण्यासाठी ऑक्सिजनचा औद्योगिक वापर जिल्हा प्रशासनाने थांबवला आहे. तरीही उद्योगांकडून गैरमार्गाने ऑक्सिजनचा वापर केला जाऊ नये, यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी शनिवारी चार अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली. हे उद्योगातील सिलिंडर वैद्यकीय कारणासाठी वापरण्यात येणार असून, याबाबतचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी दिले.

सध्या जिल्ह्यातील अडीच हजारांवर रुग्ण ऑक्सिजनवर असून, दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा कसा करायचा, या चिंतेत प्रशासन आहे. प्रशासन रात्रंदिवस काम करत असून, जमेल तेथून जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्योगात होणाऱ्या ऑक्सिजनच्या वापरावर बंदी आणली आहे. तरीही उत्पादकांकडून गैरमार्गाने ऑक्सिजन मिळवून त्याचा उद्योगासाठी वापर केला जाण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी व उद्योगांची तपासणीसाठी समिती नेमली आहे.

अशी आहे समिती..

एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी धनाजी इंगळे, नगररचना विभागाचे सहायक संचालक धनाजी इंगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त मोहन केंबळकर.

---

८७० सिलिंडर कोविड केंद्रांसाठी

सध्या औद्योगिक कारणासाठी ऑक्सिजनचा पुरवठा बंद असल्याने तेथील सिलिंडर रिकामे पडून आहेत. हे ८७० सिलिंडर आता रुग्णांसाठी वापरण्यात येणार असून, उद्योगाच्या जवळच्या ठिकाणी असलेली रुग्णालये, कोविड केअर सेंटर व कोविड रुग्णालयांना देण्यात येणार आहे.

तालुका : देण्यात येणारे सिलिंडर

हातकणंगले : २१०

करवीर : १००

शिरोळ : १२०

कोल्हापूर महापालिका : ७०

कागल : ६०

भुदरगड : ५५

शाहुवाडी : ५०

पन्हाळा : ५०

राधानगरी : ४०

आजरा : ४०

चंदगड : ४०

गडहिंग्लज : २५

गगनबावडा : १०

--

Web Title: Committee to prevent industrial use of oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.