सौर कुंपणाच्या चौकशीसाठी समिती
By Admin | Updated: November 21, 2014 00:31 IST2014-11-21T00:17:42+5:302014-11-21T00:31:48+5:30
तीन गावांतील कुंपण : वनक्षेत्रपालांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

सौर कुंपणाच्या चौकशीसाठी समिती
सावंतवाडी : वन्य प्राण्यांकडून होणारी नुकसानी टाळण्यासाठी वनविभागाने नेमळे, तळवडे व मळगाव या तीन गावांत लावलेल्या सौर कुंपणाच्या कामात अनियमितता आढळल्याने अखेर सावंतवाडी वनक्षेत्रपाल संजय पाटील यांना वनविभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. तसेच या प्रकरणी सहायक उपवनसंरक्षक शिरीष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, सन २०१३ ते २०१४ या कालावधीसाठी वनविभागाला जिल्हा नियोजन विभागातून ७५ लाखांचा निधी हा नेमळे, मळगाव व तळवडे या गावांच्या सीमेवर ज्या ठिकाणाहून वन्य प्राणी प्रवेश करतात, तेथे सौर कुंपण लावण्यासाठी दिला होता. मात्र, या निधीप्रमाणे प्रत्यक्षात जाग्यावर कामच झाले नाही. तसेच मळगाव, तळवडे, नेमळे येथे सौर कुंपणाच्या तारा या पोल जोडून टाकायच्या असतात. त्या झाडावरून जोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे अद्यापही वन्य प्राणी या परिसरात नुकसान करीत असल्याने शिवसेना व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांची भेट घेऊन संबंधित कामाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या आंदोलनानंतर उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी या प्रकरणाची प्राथमिक स्तरावर चौकशी करून त्याचा अहवाल मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांना पाठवला होता. या अहवालानंतर आज, गुरुवारी सावंतवाडी वनक्षेत्रपाल संजय पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबतचे आदेश येथील वनविभागाला प्राप्त झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत पाटील यांना नोटीस बजावणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
वनक्षेत्रपाल पाटील यांच्याव्यतिरिक्त अन्य कुणाला नोटीस बजावणार, याबाबत अद्याप निर्णय झाला नसून सौर कुंपणासाठी ७५ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी २५ लाख रुपये ठेकेदाराला अदा केल्याची माहिती प्राप्त झाली असून, उर्वरित धनादेश थांबवून ठेवण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
चौकशी सुरू : कुलकर्णी या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहायक उपवनसंरक्षक शिरीष कुलकर्णी यांची नियुक्ती केली असून, आपण चौकशी सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बुधवारपर्यंत गावकऱ्यांसमवेत या कामाची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.