कोविड सेंटरमधील लैंगिक अत्याचारप्रकरणी चौकशी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:16 IST2021-06-19T04:16:22+5:302021-06-19T04:16:22+5:30

कोल्हापूर : महानगरपालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठ वसतिगृह क्रमांक ३ मध्ये एका अल्पवयीन निराधार मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी चौकशी ...

Committee on Inquiry into Sexual Abuse at the Covid Center | कोविड सेंटरमधील लैंगिक अत्याचारप्रकरणी चौकशी समिती

कोविड सेंटरमधील लैंगिक अत्याचारप्रकरणी चौकशी समिती

कोल्हापूर : महानगरपालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठ वसतिगृह क्रमांक ३ मध्ये एका अल्पवयीन निराधार मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी चौकशी करण्याकरिता प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे.

प्रशासक बलकवडे यांनीच शुक्रवारी पत्रकारांना माहिती दिली. कोविड सेंटरमध्ये घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. पोलीस त्याचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. अनाथ मुलींचे संगोपन करणाऱ्या कोल्हापुरातील एका संस्थेतील अल्पवयीन मुलीवर कोविड सेंटरमधील कंत्राटी वॉर्डबॉय अंकुश मच्छिंद्र पवार याच्याकडून लैंगिक अत्याचार झाला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून त्याला अटकही झाली आहे.

पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असताना महानगरपालिकाही घडलेल्या प्रकाराची चौकशी करणार आहे. त्याकरिता उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्यासह एक महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची समिती नियुक्त केली आहे. ही चौकशी कोविड सेंटरमध्ये सुरक्षिततेच्या बाबत काही त्रुटी होत्या का? तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते की नाही, कोविड सेंटरमधील कोणी जबाबदार आहे का? हा प्रकार घडला तेव्हा तेथे महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली होती की नाही या प्रशासकीय बाबींच्या अनुषंगाने असणार आहे.

उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या समितीने चौकशीला सुरुवात केली आहे. कोविड सेंटरची पाहणीही त्यांनी केली आहे. तेथील कर्मचाऱ्यांचे जाबजबाब घेतले जात आहेत. अत्याचारग्रस्त मुलीशीही त्या चर्चा करणार आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.

Web Title: Committee on Inquiry into Sexual Abuse at the Covid Center