आयुक्तांवर अविश्वास ठराव दाखल करणार
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T23:58:35+5:302015-07-25T01:13:31+5:30
मुश्रीफ : कार्यक्रमास न आल्याने नगरसेवकांना आदेश

आयुक्तांवर अविश्वास ठराव दाखल करणार
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळ कामाच्या प्रारंभास गैरहजर राहून शाहू महाराजांचा अवमान करणाऱ्या आयुक्त पी. शिवशंकर यांच्या विरुद्ध महापालिका सभेत अविश्वास ठराव दाखल करण्यात येणार आहे. तसा आदेशच आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना दिला.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने नर्सरी बागेत राजर्षी शाहू महाराज यांचे समाधिस्थळ उभारण्यात येत असून, त्याच्या कामाचा प्रारंभ शुुुक्रवारी श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते व आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमास मनपा आयुक्त पी. शिवशंकर गैरहजर होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाहू महाराज यांनी, आयुक्त कुठे आहेत? अशी विचारणा आमदार मुश्रीफ यांच्याकडे केली. मुश्रीफ यांनी त्याचा संदर्भ भाषणात द्यायचा राहून गेला. आपल्या भाषणात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेसाठी किती निधी आणला, हे सांगितले. तसेच भाजप-शिवसेना नेते सत्तेत आल्यानंतरही एकमेकांवर आरोप करत बसले असल्याचे सांगितले.
भाषण संपल्यावर मुश्रीफ खुर्चीवर जाऊन बसले आणि त्यांना आयुुक्तांची आठवण झाली. ते पुन्हा बोलायला उठले. माईकचा ताबा घेतला आणि बोलायला लागले. ‘आयुक्त कुठे आहेत? अशी विचारणा मला श्रीमंत शाहू महाराजांनी केली. आयुक्त शिवशंकर यांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायला पाहिजे होते; पण ते आले नाहीत. मागे एकदा असेच ते एका कार्यक्रमास आले नाहीत. जिल्ह्यात नवीन आयएएस अधिकारी आले आहेत. ते स्वत:ला ‘सुपिरर’ समजतात. आपण म्हणजे खूप शहाणे आहोत. आपण म्हणजे मालक आहोत, अशा थाटात ते वावरत असतात. आयुक्तांनी कार्यक्रमाला गैरहजर राहणे हा राजर्षी शाहू महाराजांचा अवमान आहे. महाराजांचा अवमान करणाऱ्या आयुक्तांची बदली झाली पाहिजे म्हणूनच सर्व नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात येत्या महासभेत अविश्वासाचा ठराव दाखल करावा,’ असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.
काँग्रेसचे नेते सतेज पाटील सध्या परदेशात असून, ते कोल्हापुरात आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून आयुक्तांविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल करण्यात येईल, असे राष्ट्रवादीचे गटनेते राजेश लाटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पूर्वकल्पना दिली होती
माझी तब्येत बरी नसल्याने शाहू समाधिस्थळ कामाच्या प्रारंभास येऊ शकणार नाही, याची कल्पना आपण स्थायी समिती सभापती आदिल फरास यांना आधी दिली होती. शाहू महाराजांबद्दल मलाही आस्था आहे, म्हणूनच त्यांच्या समाधिस्थळाच्या कामाची तातडीने निविदा प्रक्रिया राबवून वर्कआॅर्डरही दिली होती. हे काम चांगले व्हावे यासाठी मी व्यक्तिश: प्रयत्न करत आहे. त्यामुळे कोणाचा गैरसमज नसावा.
- पी. शिवशंकर, आयुक्त, कोमनपा