‘हॉटेल सयाजी’चे उद्या कमर्शियल लाँचिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2015 00:37 IST2015-05-06T00:29:18+5:302015-05-06T00:37:10+5:30
ऋतुराज पाटील : कोल्हापूरची नेमकी गरज ओळखून हॉटेलची उभारणी

‘हॉटेल सयाजी’चे उद्या कमर्शियल लाँचिंग
कोल्हापूर : कोल्हापूरच्या विकासासाठी वर्ल्ड क्लास हॉस्पिटॅलिटीची गरज होती. ही गरज ‘हॉटेल सयाजी’ने पूर्ण केली आहे. अत्याधुनिक सुविधांसह परिपूर्ण असलेले ‘हॉटेल सयाजी’ उद्या, गुरुवारपासून सर्वांसाठी खुले होईल. यादिवशी पंचतारांकित सुविधा असलेल्या ‘सयाजी’चे कमर्शियल लाँचिंग करून ते ग्राहकांच्या सेवेत रुजू केले जाणार आहे, अशी माहिती डी. वाय. पी. हॉस्पिटॅलिटीचे संचालक ऋतुराज पाटील व सयाजी ग्रुपच्या संचालिका सुचित्रा धनानी यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.संचालक ऋतुराज पाटील म्हणाले, शिक्षण, क्रीडा, आदी विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या डी. वाय. पाटील ग्रुपने कोल्हापूरची नेमकी गरज ओळखून डी. वाय. पी. हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ‘हॉटेल सयाजी’ची उभारणी केली. आदरातिथ्याबद्दल जागरूक असणाऱ्या सयाजी ग्रुपची हॉटेल्स बडोदा, इंदोर, पुणे व भोपाळ येथे सुरू आहेत. ‘बारबेक्यू नेशन’च्या ४५ उपशाखा कार्यरत आहेत. पर्यटक, भाविक आणि व्यवसायानिमित्त कोल्हापुरात येणाऱ्यांसाठी ‘सयाजी’च्या माध्यमातून चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी उभारण्यात आलेल्या ‘सयाजी’ला कोल्हापूरकरांनी भरभरून पाठबळ द्यावे.
संचालिका सुचित्रा धनानी म्हणाल्या, बडोदा, इंदौर, पुणे आणि कोल्हापूरचे एक वेगळे नाते आहे. त्यामुळेच आम्ही पुण्यानंतर कोल्हापुरात ‘सयाजी’ची सुरुवात केली. अतिथी, कर्मचारी, पुरवठादार, गुंतवणूकदार यांना खूश करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आमचा कोणताही कर्मचारी टिप्स स्वीकारणार नाही.
स्थानिक आढावा घेऊन त्या पद्धतीने आम्ही जेवणाच्या रुचीत बदल करतो. मॅरेज पॅकेजची सुविधा ‘सयाजी’कडे उपलब्ध आहे. ती कोल्हापुरात सुरू केली आहे. आम्हाला कोल्हापूरकरांची साथ हवी आहे.
जनरल मॅनेजर अभिजित रेगे म्हणाले, कोल्हापुरात गेल्या महिन्याभरात ‘सयाजी’ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोल्हापूरकरांसाठी आम्ही वेगवेगळ्या संकल्पना राबविणार आहोत. पत्रकार परिषदेस ‘सयाजी’चे कॉर्पोरेट संचालक अमित सिन्हा, अभिजित पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सन्मानार्थ ‘सयाजी’ नाव...
बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांना दूरदृष्टी होती. त्याद्वारे त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, आदी क्षेत्रांत कार्य केले. आमच्या हॉटेलची सुरुवात बडोद्यामधून झाली. महाराजांच्या सन्मानार्थ आम्ही आमच्या हॉटेल ग्रुपचे नाव ‘सयाजी’ ठेवले असल्याचे संचालिका सुचित्रा धनानी यांनी यावेळी सांगितले.
‘सयाजी’ची वैशिष्ट्ये
सर्व सुविधांनी युक्त १२० रूम्स
दक्षिण महाराष्ट्रातील सर्वांत जास्त बँक्वेटिंगची क्षमता
६० हजार स्क्वेअर फुटांचे ‘साज’ हे लॉन उपलब्ध
कॉर्पोरेट कंपन्यांच्या बैठकीसाठी बिझनेस सेंटरची सुविधा
६०० लोकांची आसन व्यवस्था असलेला ‘मेघ मल्हार’ हा बँक्वेट हॉल
२४ तास सुरू असणारे ‘मून ट्री’ हे कॉफी शॉप