पदोन्नतीची प्रक्रिया सुरळीत करण्याचा प्रयत्न स्तुत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST2021-01-08T05:14:56+5:302021-01-08T05:14:56+5:30
कोल्हापूर : प्राध्यापकपदासाठी स्थाननिश्चितीचे प्रस्ताव कसे तयार करावेत, या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करून पदोन्नतीची प्रक्रिया सुरळीतपणे पार ...

पदोन्नतीची प्रक्रिया सुरळीत करण्याचा प्रयत्न स्तुत्य
कोल्हापूर : प्राध्यापकपदासाठी स्थाननिश्चितीचे प्रस्ताव कसे तयार करावेत, या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करून पदोन्नतीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याचा ''सुटा''चा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात ‘सुटा’तर्फे आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. शिर्के बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘सुटा’ने प्राध्यापकांच्या हक्कांसाठी व प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला आहे. प्राध्यापकांना पदोन्नतीचे लाभ मिळवून देण्यात ‘सुटा’ची मोठी भूमिका आहे. यामुळे पदोन्नतीच्या निकषांचे नेमके आकलन होईल, अशाप्रकारचे उपक्रम ‘सुटा’ राबविते, हे सर्वांसाठी अनुकरणीय आहे.
प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी.एस. पाटील यांनीही आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त संशोधन पत्रिकांमध्ये शोधनिबंधाचे प्रकाशन कसे करावे, इम्पॅक्ट फॅक्टर, सायटेशन इंडेक्स आदीसंदर्भात मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात डॉ. आर. जी. कोरबू यांनी, ‘प्राध्यापक पदासाठीचे निकष व सहाव्या वेतन आयोगानुसार ए. पी.आय. फॉर्म कसा भरावा’ यासंदर्भात पीपीटीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. प्रकाश कुंभार यांनी, सातव्या वेतन आयोगातील प्राध्यापक पदासाठी स्थाननिश्चितीच्या तरतुदी व वार्षिक स्वयंमूल्यमापन अहवालासंदर्भात सादरीकरण केले. तिसऱ्या सत्रात डॉ. सुनील सावंत यांनी मुलाखतीची तयारी कशी करावी, याविषयी विवेचन केले. त्यानंतर प्राध्यापकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. प्रास्ताविक ‘सुटा’चे अध्यक्ष प्रा. आर. के. चव्हाण यांनी केले. ‘सुटा’चे विश्वस्त प्रा. एस. जी. पाटील यांनीही प्राध्यापकांना संबोधित केले. सूत्रसंचालन डॉ. अरुण शिंदे यांनी केले. यावेळी ‘सुटा’चे समन्वयक प्रा. सुधाकर मानकर, प्रमुख कार्यवाह प्रा. डी. एन. पाटील, प्रा. इला जोगी. प्रा. अरुण पाटील. प्रा. डी. आर. भोसले आदी उपस्थित होते.
फोटो : ०४०१२०२१-कोल-शिवाजी युनिर्व्हसिटी
फोटो ओळी : ‘सुटा’च्यावतीने आयोजित ‘प्राध्यापक पदासाठी स्थाननिश्चिती मार्गदर्शन कार्यशाळे’चे उद्घाटन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, डावीकडून प्रा. डॉ. सुनील सावंत, प्रा. एस. जी. पाटील, प्र-कुलगुरू डॉ. एस. पी. पाटील, प्रा सुधाकर मानकर उपस्थित होते.