‘कॉमेडीच्या बुलेट ट्रेन’ने धमाकेदार प्रारंभ
By Admin | Updated: January 10, 2016 01:03 IST2016-01-10T01:03:14+5:302016-01-10T01:03:14+5:30
भीमा फेस्टिव्हल : पहिल्या दिवशी प्रेक्षकांची गर्दी; अंशुमन, पॅडी, अभिजित चव्हाणची धमाल

‘कॉमेडीच्या बुलेट ट्रेन’ने धमाकेदार प्रारंभ
कोल्हापूर : शिवाजी स्टेडियमवर प्रेक्षकांची खचाखच गर्दी... अप्रतिम विद्युत रोषणाई अन् अंशुमन, पॅडी, अभिजित, प्राजक्ता हणमगर, सुप्रिया पाठारेची धमाल व योगेश शिरसाट, अरुण कदम यांची ‘कॉमेडीच्या बुलेट ट्रेन’मधील धमाल आणि दीपाली सय्यद हिचे नृत्य अशा वातावरणात शनिवारी भीमा फेस्टिव्हलला उद्घाटनाच्या दिवशी उदंड प्रतिसाद लाभला. हा फेस्टिव्हल पाहण्यासाठी बालगोपाळांसह वृद्धांनी एकच गर्दी केली होती. त्यासाठी आयोजकांतर्फे तब्बल पाच साईड स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. फेस्टिव्हलमध्ये कोल्हापूरच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकल्याने या कलाकारांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.
भीमा फेस्टिव्हलला माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सुरुवात झाली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, चॅनेल बीच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, स्वरूप महाडिक, पार्श्वनाथ बँकेचे शंकर पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. सुरेश कुऱ्हाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कलर्स मराठी प्रस्तुत, ‘कॉमेडी बुलेट ट्रेन व्हाया कोल्हापूर’ हा संगीत, नृत्य आणि कॉमेडीचा कार्यक्रमाच्या सुरुवातीस केतकी पालव हिने ‘आई अंबे, जगदंबे’ नृत्यावर अप्रतिम नृत्य केले. त्यानंतर पॅडी ऊर्फ पंढरीनाथ कांबळे व अंशुमन विचारे यांनी ‘कोल्हापूरचा टोल, रंकाळ्यातील जलपर्णी, जयप्रभा स्टुडिओ, कोल्हापूरची चित्रनगरी, म्हशीचा दूधकट्टा’ आदी ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकला. त्यांना अभिजित चव्हाण, सुप्रिया पाठारे यांनी साथ दिली. त्यानंतर योगेश शिरसाट व अरुण कदम या दोघांनी विनोदी अभिनेते दादा कोंडके यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याच्या सोबतीला प्राजक्ता हनमगर हिने साथ देत लावणी सादर केली. त्यानंतर सुप्रिया पाठारे, ‘पॅडी’ने कॉमेडी केली. दीपाली सय्यद हिने ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘पिंगा’ गीतावर नृत्य सादर केले. अभिनेत्री क्रांती रेडकर हिने सूत्रसंचालन केले.
‘मौनी खासदार’ ओळख पुसली : महाडिक
दीड वर्षापूर्वी मी खासदार झालो. यापूर्वी ‘मौनी खासदार’ म्हणून कोल्हापूरची ओळख होती. ती आता पुसली आहे. कारण ‘देशातील टॉप टेन’ खासदारांमध्ये माझा समावेश आहे. देशपातळीवरील व स्थानिक पातळीवरील प्रश्न संसदेत प्रभावीपणे मांडून ते सोडविले. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे, असे धनंजय महाडिक यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर मुळेंचा सत्कार...
अमेरिकेतील भारतीय दूतावासाचे कौन्सिलिंग जनरल ज्ञानेश्वर मुळे यांचा खासदार महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुळे यांनी, मी कोल्हापूरचा असून माझे शिक्षण गंगावेशमधील एका शाळेत झाले. तुम्ही सर्वजण न्यूयॉर्कला या, हे मी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावतीने तुम्हास निमंत्रण देत आहे, असे सांगितले.
आज फेस्टिव्हलमध्ये...
म्युझिक, डान्स आणि कॉमेडीची ‘झकास म्युझिक यात्रा’ आज, रविवारी होणार आहे. त्यामध्ये स्वप्निल जोशी, नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, प्रियदर्शन जाधव, सचिन पाटील, केतकी माटेगावकर, स्मिता गोंदकर यांच्यासह भूषण कडू, विजय कदम, ऊर्मिला धनगर, आदी कलाकार कला सादर करणार आहेत.
थंडीतही उत्साह कायम
शहरात थंडीचे वातावरण असताना देखील प्रेक्षकांनी कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या कार्यक्रमाचा आबालवृद्धांनी आस्वाद घेतला. कलाकारांनी सादर केलेल्या कोड्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली.