कोल्हापूर : विमान म्हटलं की, आबालवृद्धांची उत्सुकता लगेचच ताणली जाते. ही उत्सुकता लक्षात घेऊन त्यांना देश-विदेशांतील विमानांच्या प्रतिकृती आणि त्यांच्याबाबतच्या माहितीचा खजाना लुटण्याची संधी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पालकांना ‘लोकमत’ने उपलब्ध करून दिली आहे. ‘लोकमत बाल विकास मंच’ने ‘सफर विमानांची’ हे प्रदर्शन आयोजित केले आहे. कमला कॉलेज येथील डॉ़ व्ही़ टी़ पाटील स्मृतिभवन येथे रविवार (दि. १८) ते मंगळवार (दि. २०) पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन होणार आहे. प्रदर्शनाचे प्रायोजक चाटे गु्रप आॅफ एज्युकेशन, सहप्रायोजक शाहू दूध, तर सादरकर्ते पीबीसीस अॅरो हब आहे.सध्या वैमानिक म्हणून करिअर करण्याकडे अनेक पालक-विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. पण, त्यांना याबाबतची नेमकी माहिती, मार्गदर्शन मिळत नाही. त्याबाबतचा खर्च बऱ्याच जणांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यांच्याशी ‘लोकमत बाल विकास मंच’ हा ‘सफर विमानांची’ प्रदर्शनाच्या माध्यमातून मार्गदर्शकाची भूमिका निभावणार आहे. रविवार (दि. १८) पासून तीन दिवस होणाऱ्या प्रदर्शनात विविध प्रकारच्या विमानांच्या प्रतिकृती, विमानक्षेत्राचा आतापर्यंतचा इतिहास, आदींची माहिती दिली जाणार आहे. प्रदर्शनादरम्यान दररोज सकाळी अकरा, दुपारी एक आणि दुपारी चार व सहा वाजता विद्यार्थी-पालकांना ‘क्वॉडकॉप्टर’ची भरारी पाहता येणार आहे. कोल्हापुरात पहिल्यांदाच होत असलेले हे प्रदर्शन विद्यार्थ्यांना वैमानिक म्हणून करिअर करण्याच्या दृष्टीने दिशादर्शक ठरणारे आहे. माहितीने परिपूर्ण, प्रेक्षणीय आणि वाचनीय असलेल्या या प्रदर्शनाला भेट देऊन विमानांबद्दलचे ज्ञान ‘अपडेट’ करा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)
चला, करूया ‘सफर विमानांची’
By admin | Updated: January 17, 2015 00:07 IST