‘महाडिक’ नावावर निवडून येऊन दाखवा

By Admin | Updated: May 12, 2015 00:35 IST2015-05-12T00:27:29+5:302015-05-12T00:35:47+5:30

सतेज पाटील यांचे आव्हान : पाचगावची योजना मीच मंजूर केली

Come and choose 'Mahadik' | ‘महाडिक’ नावावर निवडून येऊन दाखवा

‘महाडिक’ नावावर निवडून येऊन दाखवा

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणात प्रत्येकवेळी कुणाची नाही तर कुणाची कुबडी घेऊन निवडून येणाऱ्यांनी राजकीय ताकदीचा तोरा मिरवू नये. हिंमत असेल तर खासदार धनंजय महाडिक व आमदार अमल महाडिक यांनी राजीनामा देऊन कोल्हापूरच्या जनतेकडे नुसते ‘महाडिक’ या नावावर मते मागून जिंकून दाखवावे, असे आव्हान माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिले आहे.
रविवारी पाचगाव (ता. करवीर) येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या पायाभरणी कार्यक्रमात बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती. ‘महाडिक’ नावाचे राजकारणात वलय तयार झाल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यास प्रत्त्युतर देताना पाटील म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, हसन मुश्रीफ, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व डी. वाय. पाटील यांना साकडे घातल्याने आम्ही त्यांना मदत केली; परंतु निवडून आल्यावर त्यांनी विश्वासघाताचे राजकारण केले. ‘महाडिक म्हणून निवडून आलो,’ असा त्यांचा दावा असेल तर बंटी पाटील गटाने त्यांना मदत केली नसती तर त्यांच्या अंगावर खासदारकीचा गुलाल पडला असता का, हा प्रश्न त्यांनी स्वत:लाच विचारावा. अमल महाडिक हे त्यांच्या कर्तृत्वामुळे नव्हे, तर नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे आमदार झाले. अशांनी महाडिक नावाची किमया कोल्हापूरला सांगू नये. त्यांना एवढीच जर हिंमत असेल तर राजीनामा देऊन ‘महाडिक’ नावावर निवडणूक लढवावी. मग कोल्हापूरची जनता कुणाच्या बरोबर आहे हे त्यांना दिसेल. राजाराम कारखान्यात येलूरचे मतदार वगळले तर उत्पादक सभासद कुणाच्या मागे आहेत हे निकालानेच स्पष्ट केले आहे. ‘गोकुळ’च्या निवडणुकीतही मते बाद झाली नसती तर किमान पाच ते सहा संचालक आमच्या गटाचे निवडून येऊ शकले असते हे मतांची आकडेवारीच सांगते. कायम विमानातून फिरत असल्याने खासदार हवेत आहेत. त्यांनी जरा जमिनीवर यावे म्हणजे हे वास्तव त्यांना दिसेल.
ते म्हणाले, ‘पाचगावचा पाणी प्रश्न आम्ही सोडवला, अशी वल्गना करणाऱ्या खासदारांना पाच महिन्यांत योजना मंजूर होऊन कधी कार्यान्वित होते का एवढा तरी ‘कॉमन सेन्स’ हवा होता. त्यांनी खासदार म्हणून वर्षभरात कोणते प्रश्न सोडवले..? विमान सेवा पंधरा आॅगस्टपासून सुरू करणार होते त्याचे काय झाले..? मंत्र्यांना निवेदने दिली म्हणजे प्रश्न सोडवला असे होत नाही. आता निवेदन संपल्याने तेही काम बंद झाले आहे. प्रत्येकवेळी कुणाची तरी राजकीय मदत घ्यायची आणि सत्ता आली की, महाडिक म्हणून उदोउदो करायचा ही काका-पुतण्यांची जुनीच सवय आहे. मदत केलेल्यांच्या उलटे जायचे हा त्यांच्या राजकारणाचा धर्मच आहे. त्यास कोल्हापूरची जनता योग्यवेळी उत्तर देईल. पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल खासदारांनी केलेली विधाने लोकप्रतिनिधी म्हणून दुर्दैवी आहेत.’ (प्रतिनिधी)

Web Title: Come and choose 'Mahadik'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.