ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. ८ - सैनिकांच्या पत्नीविषयी आमदार प्रशांत परिचारक यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्याचा निषेध करीत काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने आमदार परिचारक यांच्या प्रतीकात्मक पुतळयाचे दहन काँग्रेस संपर्क कार्यालयासमोर बुधवारी करण्यात आले. तसेच जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
आमदार प्रशांत परिचारक हे सोलापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यांना निवडणुकीत भाजपने पाठिंबा दिला होता. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भोसे येथील प्रचारसभेत त्यांची जीभ घसरली होती. या सभेत परिचारक यांनी राजकारण काय असते हे सांगताना सीमेवरील जवानाविषयीचे वादग्रस्त विधान केले होते. त्याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रासह देशात करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास येथील काँग्रेस संपर्क कार्यालयासमोर काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने आमदार परिचारक यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यापूर्वी या पुतळ्याला जोड़ेही मारण्यात आले.
यावेळी महिला आघाडी तालुकाध्यक्षा स्वाती राणे , कणकवलीच्या माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, नगरसेविका माया सांब्रेकर, सुविधा साटम, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या श्रिया सावंत, स्वरूपा विखाळे,सायली सावंत, राजलक्ष्मी डीचवलकर , पंचायत समिती सदस्या भाग्यलक्ष्मी साटम, हर्षदा वाळके, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, महेश लाड, दिलीप तळेकर , महेश गुरव, संदीप मेस्त्री, बबन हळदिवे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)