तासगावमध्ये कोम्बिंग आॅपरेशन
By Admin | Updated: June 3, 2015 01:01 IST2015-06-02T23:53:38+5:302015-06-03T01:01:51+5:30
दरोडेखोरांचा शोध : दीडशे पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर

तासगावमध्ये कोम्बिंग आॅपरेशन
तासगाव : तासगावच्या पोलीस कोठडीतून रविवारी रात्री तीन अट्टल दरोडेखोर फरारी झाले. त्यांच्या शोधासाठी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सात पथके कार्यरत आहेत. ८० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शोधासाठी कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.
रविवारी मध्यरात्री तासगावच्या पोलीस कोठडीतून तीन अट्टल दरोडेखोर फरारी झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी सात विशेष पोलीस पथके तैनात करण्यात आलेली आहेत. या दरोडेखोरांच्या गावाकडेही पथक पाठविण्यात आले आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील पोलिसांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. दरोडेखोरांच्या अंगावर पूर्ण कपडे नाहीत. तसेच त्यांच्याकडे पैसेही नाहीत. याचा अंदाज घेऊन पोलिसांकडून कसून शोधमोहीम सुरू आहे. विशेष पथकासह ८० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी कोम्बिंग आॅपरेशनच्या माध्यमातून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी विश्वनाथ घनवट यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. विट्याचे पोलीस उपअधीक्षक अभिजित पाटील हे पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. लवकरच दरोडेखोरांना पकडण्यात यश येईल, असेही लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.
तासगाव पोलिसांनी रविवारी सायंकाळी अधिकाऱ्यांच्या निवृत्तीनिमित्त पार्टी केली नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. केवळ स्रेहमेळावा आणि भोजनाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम रात्री दहा वाजता संपला होता. त्यानंतर सर्व अधिकारी आपापल्या कामावर हजर होते. स्रेहमेळाव्याचा कार्यक्रम एका कार्यालयात होता. त्यावेळी पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार, मदतनीस आणि पोलीस कोठडीतील सुरक्षा कर्मचारी कामावरच असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)
पोलीस पोहोचण्यापूर्वी संशयितांचे पलायन
सोमवारी सायंकाळी तीन तरुण शिरगाव (विसापूर) परिसरातील ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. त्यांची विचारपूस केल्यानंतर शिकारीसाठी आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांच्याकडे शिकारीसाठीचे साहित्यही नव्हते आणि त्यांच्या अंगावर व्यवस्थित कपडेही नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांना संशय आला. ही माहिती तासगाव पोलिसांना कळाल्यानंतर पोलिसांची पथके तात्काळ शिरगावमध्ये हजर झाली. पोलीसपथक आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून शिरगाव आणि विसापूर परिसरात सर्वत्र शोध घेण्यात आला; मात्र दरोडेखोरांना शोधण्यात यश आले नाही.