कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची सभा मंगळवारी (दि. ९) होत असून त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख दूध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण सभा शांततेत कशी पार पाडता येईल?, कोणते प्रश्न येऊ शकतात? त्याला उत्तरे कशी द्यायची याची रंगीत तालीम घेण्यात आली.संघाची सभेपुर्वी प्रत्येक वर्षी अशा प्रकारची रंगीत तालीम घेतली जाते. तालुक्यातील संपर्क सभांमध्ये आलेले प्रश्न, प्रत्येक्ष सर्वसाधारण सभेत कोणते प्रश्न येऊ शकतात? याचा अंदाज घेतला जातो. या सभेपुर्वी संचालकांनी खरेदी केलेला जाजम व घड्याळसह मागील कारभाराची चौकशी सुरु आहे. त्याचे पडसाद सर्वसाधारण सभेत पडू शकतात. हे प्रश्न आले तर आपली रणनिती काय असावी, याचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर कोणी कोणते ठराव मांडायचे? हेही निश्चित करण्यात आले.बैठकीला, संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्यासह बाजार समितीचे सभापती सुर्यकांत पाटील,‘बिद्री’चे संचालक प्रवीणसिंह पाटील,भारत पाटील-भुयेकर यांच्यासह जिल्ह्यात प्रमुख संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शौमिका महाडीक यांच्या भूमिकेकडे लक्ष‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडीक यांनी यापुर्वीच ‘माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या अन्यथा मला गृहीत धरु नका’ असा इशारा दिला आहे. येत्या दोन दिवसात त्यांच्या प्रश्नांची उत्तरे संचालक मंडळ देणार असल्याचे समजते. त्यानंतरही महाडीक नेमक्या काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
चौकशीमागे अदृश्य शक्ती‘गोकुळ’चा कारभार एवढा चांगला असताना चौकशीच्या बातम्या रोज कशा येतात? अशी विचारणा एका संस्था प्रतिनिधींनी केली. यावर, या मागे अदृश्य शक्ती असल्याचा टोला अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी लगावला.
दूध संस्था कर्मचाऱ्यांना १० पैसे वाढवा‘गोकुळ’च्या वाटचालीत दूध संस्था कर्मचाऱ्यांचे योगदान नाकारता येणार नाही. त्यांच्या पगारापोटी देण्यात येणाऱ्या व्यवस्थापन खर्च रक्कमेत प्रतिलिटर पाच पैशांची वाढ केली. पण, वार्षिक वाढ पाहता फारच कमी आहे. यासाठी आणखी दहा पैसे वाढ द्यावी, अशी मागणी संचालक डॉ. चेतन नरके यांनी संचालक मंडळाच्या सभेत केली. हीच मागणी ताराबाई पार्क येथील सभेत काही संस्था चालकांनी लावून धरली.
गोकुळची आज संचालक मंडळाची सभा झाली यामध्ये नियमित विषयावर चर्चा झाली. सभेत येणाऱ्या प्रश्नांना त्यावेळी समर्पक उत्तरे दिले जातील. - नविद मुश्रीफ (अध्यक्ष, गोकुळ)