लोकमत न्यूज नेटवर्क
धामोड : ऐन कडाक्याच्या थंडीत म्हासुर्ली ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वातावरणात चांगलेच तापले असून वातावरणात चांगलाच रंग भरला आहे. या निवडणुकीत चार माजी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त कमिटीच्या अध्यक्षांसह पत्रकार ही रिगंणात उतरल्याने हाय होल्टेज सामना रंगणार आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने जेवणावळी व आश्वासनांची चांगलीच खैरात सुरू झाली आहे .
म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक होत असून चार प्रभागांत स्थानिक आघाड्या एकमेकांशी सामना करत आहेत. त्यामुळे सर्वच चारही प्रभागांतील लढती लक्षवेधी ठरणार आहेत. या निवडणुकीत चार माजी सरपंच, एक माजी उपसरपंच व तंटामुक्त अध्यक्ष तसेच पत्रकारही आपले नशीब अजमावत आहेत. राधानगरी तालुक्यातील धामणी खोऱ्यातील म्हासुर्ली ही ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अतिसंवेदनशील गाव म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या सर्वच निवडणुका या अटीतटीच्या व टोकाच्या ईर्षेच्या असतात. सध्या ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून अकरा सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत एक सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. तर उर्वरित दहा जागांसाठी २४ उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याने कमालीची चुरस निर्माण झाली आहे. प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचल्याने म्हासुर्ली ग्रामपंचायत निवडणूक यावेळी लक्षवेधी ठरणार असून स्थानिक नेत्यांचीही कसोटी लागणार आहेेे. त्यामुळे तालुक्यासह धामणी खोऱ्याचे लक्ष या ग्रामपंचायतीकडे लागून राहिले आहे.