जिल्हाधिकाऱ्यांचे दरवाजे लोकांसाठी खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:31 IST2021-09-10T04:31:02+5:302021-09-10T04:31:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्या कार्यालयाचे दोन्ही दरवाजे लोकांसाठी गुरुवारपासून उघडे केले. त्याची ...

जिल्हाधिकाऱ्यांचे दरवाजे लोकांसाठी खुले
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्या कार्यालयाचे दोन्ही दरवाजे लोकांसाठी गुरुवारपासून उघडे केले. त्याची अंमलबजावणी दिवसभरात करण्यात आली. यामुळे सामान्य, गरीब, खेड्यातून आलेल्या लोकांना चिठ्ठीविना थेट प्रवेश मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांसमोर गाऱ्हाणे मांंडण्याचा मार्ग सुकर झाला.
गाव, तालुका प्रशासनाकडे वारंवार हेलपाटे मारूनही न्याय न मिळाल्याची भावना झालेले मोठ्या आशेने जिल्हाधिकाऱ्यांकडे येतात. पण जिल्हाधिकारी इतर कामात व्यस्त् असल्याने त्यांना बाहेर ताटकळत राहावे लागते. त्यांच्या कार्यालयाचे दोन्ही दरवाजे बंद असल्याने खरेच जिल्हाधिकारी कामात व्यस्त आहेत की, शिपाई, पोलीस खोटे सांगत आहेत, अशी शंका लोकांना येते. यातून काहीवेळा सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांशी वादही होत असत. हे टाळण्यासाठी आणि सामान्यांना गाऱ्हाणे मांडण्यासाठी सहज भेट उपलब्ध् होण्यासाठी जिल्हाधिकारी रेखावार यांनी दोन्ही दरवाजे सताड उघडे ठेवण्याचा आदेश शिपायांना दिले आहेत. त्याची अंमलबजावणीही सुरू झाल्याने गुरुवारी दिवसभर लोकांना चिठ्ठीविना भेटता आले. त्यांना विनाविलंब गाऱ्हाणे मांडता आले. प्रश्र्न सुटला नाही, तरी किमान साहेब आपल्याला सहजपणे भेटले, याचाही आनंद लोकांना मोठा असतो. जिल्हा प्रशासनाबद्दलची अशा उपक्रमातून प्रतिमा उजळते. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यादिशेने पाऊल टाकले आहे.
फोटो : ०९०९२०२१-कोल - जिल्हाधिकारी रेखावार
कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाचे दोन्ही दरवाजे शुक्रवारी दिवसभर लोकांसाठी खुले राहिले.