बंदिस्त गटारीबाबत आरोग्याधिकारी धारेवर
By Admin | Updated: December 12, 2014 00:36 IST2014-12-12T00:12:08+5:302014-12-12T00:36:49+5:30
टोलविरोधी कृती समिती : ‘आयआरबी’च्या गटर्स सफाईबाबत विचारला जाब; मंगळवारी संयुक्त पाहणी दौरा

बंदिस्त गटारीबाबत आरोग्याधिकारी धारेवर
कोल्हापूर : शहरात एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पामधून ‘बीओटी’ तत्त्वावर करण्यात आलेल्या रस्त्यांच्या बाजूला दुतर्फा बांधण्यात आलेल्या गटारींची साफसफाई कितीवेळा केली? अशी विचारणा आज, गुरुवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने केली. याप्रश्नी महापालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, प्रभारी मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांना धारेवर धरत ‘आयआरबी’ विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. यावर शहरात बांधलेल्या गटारींची पाहणी करण्यासाठी समिती व प्रशासन यांचा मंगळवारी (दि. १६) संयुक्त पाहणी दौरा करू, असे आश्वासन डॉ. दिलीप पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व ‘आयआरबी’ने ‘बांधा, वापरा व हस्तांतर करा’ या तत्त्वावर शहरात ४९.४९ किलोमीटरचे रस्ते तयार केले. या रस्त्यांच्या कडेला दुतर्फा बांधलेल्या बंदिस्त गटारींची रोज साफसफाई करण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे.
या गटारींतून प्रवाहित होणाऱ्या सांडपाण्याची निर्गत व्यवस्थित होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गत तीन वर्षांत या गटारींची कितीवेळा स्वच्छता केली? अशी विचारणा बाबा इंदुलकर यांनी केली. तसेच, कितीवेळा त्यावरील झाकणे उघडून गटारींची साफसफाई केली? यांत्रिक व्यवस्था उभी केली आहे का? ‘आयआरबी’ला महापालिकेने गटारींची ‘एनओसी’(ना हरकत प्रमाणपत्र) दिली आहे का? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
त्यानंतर दिलीप देसाई, दिलीप पवार यांनीही या प्रश्नांचा जाब विचारला. त्यावर डॉ. दिलीप पाटील यांनी, बांधलेली गटारे साफसफाईसाठी अडचणीची आहेत. तरीही साफसफाई करू, असे सांगितले. विजय पाटील यांनी, गटारी स्वच्छ करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. शक्य तेवढे प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात बाबा पार्टे, संभाजी जगदाळे, अशोक पोवार, दीपा पाटील, अजित सासने, महेश सासने, लाला गायकवाड, सुरेश जरग, अशोक रामचंदानी, जयकुमार शिंदे, हंबीरराव मुळीक, वैशाली महाडिक, गीता राऊत, विवेक कोरडे, राजवर्धन यादव, सुनील मोहिते, वसंतराव मुळीक, गौरव लांडगे, सुजाता चव्हाण, सुशीला चव्हाण, किशोर घाटगे, सुनील पाटील, अॅड. पंडित सडोलीकर, अर्जुन जाधव, आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)
मांडलेले मुद्दे असे...
१) गटारींमुळे रोगराई पसरून मानवी जीवन धोक्यात येऊ शकते.
२) १७ डिसेंबर २०११ पासून आजअखेर कितीवेळा ही गटारे स्वच्छ केली ?
३) गटारींची रोज साफसफाई करण्याची महापालिकेची जबाबदारी
सक्षम अधिकाऱ्याला खुर्चीवर बसवा
महापालिकेने आरोग्य विभागाशी निगडित नेमलेल्या अधिकाऱ्यांकडे पदविका नाही. त्यामुळे या पदावर सक्षम अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसवावे, अशी मागणी दिलीप देसाई यांनी यावेळी केली.
महापालिकेबरोबर ‘आयआरबी’ने कसा करार केला आहे, हे सर्वप्रथम पाहणे गरजेचे आहे. काय करार केला आहे, हे मी पाहिलेले नाही, ते पहिल्यांदा बघू. - डॉ. दिलीप पाटील, प्रभारी आरोग्य अधिकारी, महापालिका.