वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
By Admin | Updated: July 5, 2014 01:04 IST2014-07-05T00:54:42+5:302014-07-05T01:04:19+5:30
‘मॅग्मो’चे चौथ्या दिवशीही बेमुदत धरणे आंदोलन सुरू : लढा तीव्र करणार : सौदागर

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
कोल्हापूर : राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सरकारला यापूर्र्वीच सादर केले आहेत. लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असताना सरकारकडून आंदोलन मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे या दबावाला बळी न पडता लढा तीव्र करण्याचा इशारा, महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेतर्फे(मॅग्मो) चे जिल्हाध्यक्ष डॉ. असिफ सौदागर यांनी आज, शुक्रवारी दिला.
सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांना कामांचे तास केंद्र सरकार व इतर राज्यांप्रमाणे निश्चित करावेत, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेतर्फे (मॅग्मो) छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आज, चौथ्या दिवशीही आंदोलन सुरू होते. निर्णय होईपर्यंत ‘काम बंद’ आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देत जिल्ह्णातील ३२५ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठविले आहेत.
हा प्रश्न सोडविण्याऐवजी शासनाचे वरिष्ठ अधिकारी आंदोलकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. दबाव आणून आंदोलन मागे घेण्याचे षङ्यंत्र सुरू आहे; परंतु या दबावाला बळी न पडता आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय संघटनेच्या वरिष्ठ पातळीवरून घेतला आहे. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व आरोग्य पथकांमधील सर्व वैद्यकीय अधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी एकवटले. (प्रतिनिधी)