देशी गायींच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न हवेत
By Admin | Updated: July 12, 2015 21:21 IST2015-07-12T21:21:55+5:302015-07-12T21:21:55+5:30
काडसिद्धेश्वर स्वामी : कणेरी मठावर राष्ट्रीय गोसंवर्धन संमेलनाचे उद्घाटन

देशी गायींच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न हवेत
कणेरी : पूर्वी भारतात ज्यांच्या घरात देशी गायी असत, त्या घरात कोणतेही आजार नसत; पण सध्या सगळीकडे जर्सी गायींचे दूध पोषणासाठी वापरल्यामुळे विविध प्रकारच्या आजारांची संख्या वाढत आहे. देशी गायींच्या दुधामध्ये स्निग्धतेचे प्रमाण चांगले असून, ते निरोगी शरीरासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे नागरिकांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी यांनी कणेरी मठावर आयोजित राष्ट्रीय गोसंवर्धन संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.यावेळी काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, भारतात देशी गायींची संख्या कमी होत आहे. त्यांचे संवर्धन केले पाहिजे. गोमातेला प्रतिष्ठा दिली पाहिजे. देशी गायींच्या दुधात बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त असल्याने शरीर निरोगी राहते. गोसंवर्धनासाठी सोशल मीडियाचा वापर करून प्रत्येकाने गोनिर्मित वस्तूंचा स्वीकार करावा. देशी गायींच्या दुधामुळे मानवाच्या सकारात्मक विचारांमध्ये वाढ होते.दिल्लीच्या अखिल भारतीय कृषी गोसेवा संस्थेचे केसरी चंद्र मेहता म्हणाले, देशी गायीचे दूध आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. या दुधापासून तयार होणाऱ्या दूध, दही, ताक, तूप व शेण यांचा मानवाने वापर केल्यास कोणताही आजार होत नाही. गोहत्याबंदीनंतर राज्यातील मांसाच्या किमती ४० टक्के वाढल्या आहेत.संमेलनाला महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, प. बंगाल, ओडिसा, दिल्ली, गुजरात आदी राज्यांतून १५० गोभक्त हजर होते. १३ जुलैपर्यंत हे संमेलन चालणार आहे. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुप्पीन, काडसिद्धेश्वर स्वामी, अण्णासाहेब जाधव, पंडित रामस्वरूप, श्रीमती मधुकामता बेन, बगाडे काका, सुदर्शन ढंढारिया, आदी मान्यवर उपस्थित होते. श्याम बिहारी गुप्ता यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
‘गोकुळ’तर्फे देशी गायींसाठी अनुदान
कोल्हापूर जिल्हा दूध संघ उत्पादन वाढीसाठी म्हैस व जर्सी गायींसाठी अनुदान देते; पण आता देशी गायींसाठीदेखील प्रति गाय १०,००० रुपये अनुदान देणार असल्याची माहिती संघाचे संचालक अरुण डोंगळे यांनी काडसिद्धेश्वर स्वामीजींना चर्चेवेळी सांगितले.