सामूहिक कृतीतूनच आजचे वर्तमान बदलेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST2021-01-08T05:22:07+5:302021-01-08T05:22:07+5:30
गडहिंग्लज : शंभर वर्षांपूर्वीची आव्हाने सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक स्वरूपाची होती. परंतु, अमानवी समाज, पर्यावरणाचे संरक्षण, विविधतेतील एकता, लोकशाही ...

सामूहिक कृतीतूनच आजचे वर्तमान बदलेल
गडहिंग्लज :
शंभर वर्षांपूर्वीची आव्हाने सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक स्वरूपाची होती. परंतु, अमानवी समाज, पर्यावरणाचे संरक्षण, विविधतेतील एकता, लोकशाही आणि माणूसपण टिकवणे हीच आजच्या वर्तमानातील खरी आव्हाने आहेत. त्यावर मात करण्यासाठी नव्या संवादाची, नव्या ज्ञानभाषेची व नव्या राजकारणाची गरज आहे. त्यासाठी कोणत्याही परंपरेचे गुलाम न होता सगळे कृतिशील होऊया, असे आवाहन ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी केले.
गडहिंग्लज पालिकेच्या साने गुरुजी वाचनालयातर्फे आयोजित लोकशिक्षण व्याख्यानमालेत ‘आजचे वर्तमान’ या विषयावर त्यांनी मुक्तचिंतन केले. त्यांच्याहस्ते राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते बाबासाहेब नदाफ यांना राज्यस्तरीय डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, कृष्णात खोत यांना सानेगुरुजी साहित्य पुरस्काराने, पुष्पा पाटील यांना आदर्श शिक्षका, मंजूर बागवान व व्यंकटेश किणी यांना आदर्श वाचक पुरस्काराने गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी श्रीपतराव शिंदे होते.
देवी म्हणाले, २१ व्या शतकातील नव्या दशकातील नागरिकत्व आणि शेतकरीविरोधी कायद्यांच्या आंदोलनातून नवी प्रेरणा मिळाली आहे. मानव, वनस्पती व प्राणी यांचा एकत्र विचार आणि मानवी कल्पना शक्तीला वाव देणाऱ्या साहित्य, कला व संस्कृतीच्या माध्यमातून तरुणाईच्या साथीनेच नवे परिवर्तन घडवता येईल.
कार्यक्रमास उपनगराध्यक्ष महेश कोरी, जे. बी. बारदेस्कर, राजन गवस, सुरेखा देवी, कॉ. संपत देसाई, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर उपस्थित होते.
नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब मुल्ला व गणपतराव पाटोळे यांनी मानपत्र वाचन केले. राजश्री कोले यांनी सूत्रसंचालन केले. शशिकला पाटील यांनी आभार मानले.
-----------------------------------------------------
* लोकशाहीचे खांब भंगारात
सुप्रीम कोर्ट, सीबीआय, निवडणूक आयोग, आरबीआय, विद्यापीठे हे लोकशाहीचे खांब भंगारात काढण्यात आले आहेत. केंद्राने राज्यांचे अधिकार हिरावून घेतले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार अधिकाराने अधिक लठ्ठ आणि राज्य सरकारे कमकुवत बनली आहेत. त्यामुळे संघराज्य व्यवस्था व विविधतेतील एकतेच्या नरड्याला नख लागले आहे, ही चिंतेची बाब आहे.
-----------------------------------------------------
* देवींची विन्रमता
देवी यांनी व्यासपीठावरून खाली उतरून साने गुरुजींच्या प्रतिमेजवळ येऊन सेवादल सैनिकांचा सत्कार स्वीकारला. भाषणाच्या प्रारंभी त्यांनी शेतकरी आंदोलनातील ५२ हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आणि पुरोगामी गडहिंग्लजकरांच्या प्रती विनम्रता व्यक्त करण्यासाठी त्यांनी खाली बसून बोलण्याची परवानगी मागितली. परंतु, लोकांच्या विनंतीनुसार त्यांनी व्यासपीठावरूनच संवाद साधला.
-----------------------------------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे डॉ. गणेश देवी यांच्याहस्ते बाबासाहेब नदाफ यांचा डॉ. नरेंद्र दाभोलकर पुरस्काराने गौरव झाला. यावेळी नागेंद्र मुतकेकर, महेश कोरी, स्वाती कोरी, श्रीपतराव शिंदे, जे. बी. बारदेस्कर, कृष्णात खोत, पुष्पा पाटील, आदी उपस्थित होते. (किल्लेदार फोटो)
क्रमांक : ०५०१२०२१-गड-०९