कसबा सांगाव बंदला संमिश्र प्रतिसाद

By Admin | Updated: November 10, 2014 00:42 IST2014-11-10T00:02:59+5:302014-11-10T00:42:49+5:30

पोलिसांशी वादावादी : वाहनांच्या काचा फोडल्या

Collected response from Kasba Sayao | कसबा सांगाव बंदला संमिश्र प्रतिसाद

कसबा सांगाव बंदला संमिश्र प्रतिसाद

कसबा सांगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोशल मीडियावरील विटंबनेच्या निषेधार्थ आज, रविवारी कसबा सांगावमध्ये आरपीआय (आठवले गट)च्या वतीने पाळलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी संतप्त कार्यकर्त्यांची पोलिसांशी वादावादी झाल्याने तणाव निर्माण झाला होता. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले.
सकाळी सातच्या सुमारास कार्यकर्ते बाजारपेठ चौकात जमू लागले. यामध्ये अल्पवयीन तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यानंतर संपूर्ण गावामधून निषेध फेरी काढून बंदचे आवाहन करण्यात आले. बाजारपेठ चौकामध्ये टायर्स मोठ्या प्रमाणात पेटविल्याने सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वाहनधारकांची कोंडी झाली आणि प्रवाशांनाही याचा फटका बसला. यानंतर सकाळी आठच्या सुमारास कागलचे पोलीस उपनिरीक्षक दीपक वाक्चौरे घटनास्थळी दाखल झाले आणि कार्यकर्त्यांना टायरी पेटविणे बंद करून शांतता राखण्याचे आवाहन करताच कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ऊसतोडणी कामगार घेऊन आलेल्या एका ट्रकची काच पोलिसांसमोर फोडली. या प्रकारानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले.
दरम्यान, सकाळच्या पहिल्या फेरीसाठी आलेल्या एस. टी. बसच्याही काचा फोडण्यात आल्या. अचानक झालेल्या बंदमुळे जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले. परिसरातील दूध व्यवसायालाही मोठा फटका बसला. दुपारनंतर एस.टी.ची वाहतूक पूर्ववत सुरू झाली; पण व्यवहार मात्र दिवसभर बंद होते.
महापुरुषांची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी संतप्त तरुणांनी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रणजित कांबळे, बबलू कांबळे, नवनाथ कांबळे, सचिन कांबळे, नागेश कांबळे, सुशांत कांबळे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
(वार्ताहर)

Web Title: Collected response from Kasba Sayao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.