नारळ फुटल्यापासून धरणाला गळती!

By Admin | Updated: May 28, 2015 00:59 IST2015-05-28T00:47:20+5:302015-05-28T00:59:44+5:30

लाखो लिटर पाणी वाया : कामाच्या दर्जाबाबत साशंकता; गळतीकडे प्रशासनाने दुर्लक्ष; दोन वर्षांपासून ठेकेदारही गायब

Coconut smash the dam! | नारळ फुटल्यापासून धरणाला गळती!

नारळ फुटल्यापासून धरणाला गळती!

एकनाथ माळी - तारळे -तारळी धरणाला लोकार्पण सोहळ्यापासून गळतीचा शाप लागला आहे. सुमारे दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू असून अधिकाऱ्यांकडून आश्वासनांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. मात्र गळती काढण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींनी चुप्पी साधली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस लोकांमध्ये संभ्रमावस्था व धरणाच्या टिकावूपणाबद्दल शंका उत्पन्न होत आहे.
मुरूड, ता. पाटण येथे १९९८ साली ५.८५ टिएमसी इतका पाणीसाठा असणाऱ्या तारळी धरणाचा नारळ फुटला. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याचा दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळाही संपन्न झाला. त्यावेळीपासून आजअखेर धरणाला तळातून, भिंतीमधुन गळती लागली आहे. त्याकडे आजपर्यंत सर्वांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. ग्रामस्थांनी चौकशी केल्यास प्रत्येक अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी उत्तरे मिळतात. त्यामुळे तक्रार कोणाकडे करायची, हा ग्रामस्थांसमोर प्रश्न आहे. दर्जा व इतर कारणांनी सुरूवातीपासूनच धरणाचे काम चर्चेत राहिले. परराज्यातील ठेकेदार असल्याने अनेकांनी धरणाच्या कामात हात धूवून घेतला. त्यामुळे धरणाची सध्याची स्थिती चिंताजनक आहे. अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी मागणी करूनही फक्त ठेकेदारांना सुचना दिल्याचे सुमारे वर्षभरापासून सांगण्यात येत आहे. पण आजअखेर गळती काढण्याच्या कामाला सुरूवात न झाल्याने अधिकारी कमजोर व ठेकेदार शिरजोर अशी वेळ आली आहे. पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार शंभूराज देसाई यांची धरणावर मोठी सभा पार पडली असून आजही गळतीसारख्या गंभीर गोष्टीची दखल घेण्याची गरज कुणाला दिसून येत नाही.
अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकार्पण सोहळ्यानंतर ठेकेदारांना धरणाची गळती काढण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी त्यांचा ठराविक निधी शिल्लक ठेवल्याचे सांगण्यात आले. मग दोन वर्षांपासून ठेकेदार धरणाकडे फिरकत नसल्याने यामागचे गौडबंगाल लोकांसमोर येणार का ? अधिकारी सांगत असलेला ठेकेदारांचा शिल्लक निधी नक्की शिल्लक आहे का ? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पर्यटक व लोकांच्या मनात भिती जैसे थे राहिली आहे.


सुमारे एक टीएमसी पाणी वाया
वेळोवेळी ग्रामस्थांनी याबाबत आवाज उठवला तरी अधिकारी व लोकप्रतिनिधी ‘तेरी भी चुप मेरी भी चुप’ करीत आहेत. कोण कोणाला पाठिशी घालून कोण कुणाचे पाप झाकतय हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे. पर्यटकांच्या अंदाजानुसार अर्धा ते एक तास टी.एम.सी पाणी गळतीद्वोर नदीत वाहून जात आहे.


सुचनांना ठेकेदाराकडून
केराची टोपली
गळतीच्या प्रश्नावर जनतेमध्ये संशयाचे वातावरण आहे. तर अधिकारी व ठेकेदार यांच्यात कसलाच ताळमेळ दिसत नाही. दोन वर्षांपूर्वी ठेकेदारांना केलेल्या सुचनांना केराची टोपली दाखवली की काय, का अधािकऱ्यांचा वचक कमी झाला हे समजत नसल्याने दिवसेंदिवस धरणाच्या टिकाऊपणाबाबत अनेक शंका कुशंका उपस्थित करण्यात येत आहे.

Web Title: Coconut smash the dam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.