दीडशे कोटींच्या कामांचा फुटला नारळ

By Admin | Updated: July 28, 2014 00:02 IST2014-07-27T23:23:19+5:302014-07-28T00:02:55+5:30

आंदोलनाच्या भीतीने ‘झूम’चे उद्घाटन रद्द : महापौरांचा राजीनाम्याच्या आदल्या दिवशी धडाका

Coconut cottage | दीडशे कोटींच्या कामांचा फुटला नारळ

दीडशे कोटींच्या कामांचा फुटला नारळ

कोल्हापूर : महापौर सुनीता राऊत यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी महापालिकेच्या तब्बल दीडशे कोटींच्या कामांच्या उद्घाटनाचा नारळ फोडण्यात आला. जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आज, रविवारी कसबा बावडा सांडपाणी शुद्धीकरण केंद्र, टाकाळा कचरा खण, दुधाळी सांडपाणी शुद्धीकरण केंद्र, आदींचे उद्घाटन झाले. लाईन बझार येथील झूम प्रकल्प येथे परिसरातील नागरिकांच्या रोषाच्या भीतीने कचऱ्यावर वीजनिर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केला.
पंचगंगा प्रदूषणामुळे कोल्हापूर शहराची मोठी बदनामी होत होती. महापालिका प्रशासन व आयुक्त यांना न्यायालयाच्या कारवाईची भीती सतावत होती. केंद्रात आता पहिल्या टप्प्यात ४८ एमएलडी सांडपाणी व त्यानंतर २६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. दुधाळी नाल्याजवळील केंद्राचेही काम लवकरच हाती घेण्यात येईल. यामुळे शहर जलप्रदूषणाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असल्याचे आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी सांगितले.
महापालिकेच्या इतिहासात सर्वाधिक निधीची कामे मार्गी लावल्याचा विशेष आनंद होत असल्याची प्रतिक्रिया महापौर सुनीता राऊत यांनी दिली. केंद्र व राज्यस्तरावरील प्रलंबित निधी व भविष्यातील योजनांबाबत निधी आणण्यात कमी पडणार नाही, अशी ग्वाही दोन्ही मंत्र्यांसह खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. राजेश लाटकर यांनी आभार मानले. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, सत्यजित कदम, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त संजय हेरवाडे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आदीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Coconut cottage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.