पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव
By Admin | Updated: October 29, 2014 00:15 IST2014-10-28T22:32:33+5:302014-10-29T00:15:29+5:30
‘लोकमत’चा दणका : इचलकरंजी येथील कचरा उठाव करण्याची मागणी

पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव
इचलकरंजी : येथील कचऱ्याचा उठाव होत नसल्याची बातमी काल, सोमवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतरही पालिकेची यंत्रणा जागी झाली नाही. याची दखल घेत आज, मंगळवारी येथील भारतीय जनता पक्षाच्यावतीने पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार व उपमुख्याधिकारी श्रीराम गोडबोले यांना घेराव घालून धारेवर धरले. दोन दिवसांत शहरातील संपूर्ण कचरा उठावाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करून नागरिकांना स्वच्छते संदर्भात प्रेरणा देण्याचे काम केले. देशभरामध्ये या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, इचलकरंजीत याउलट परिस्थिती बनल्याचे दिसत आहे. शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, भरलेले कोंडाळे, तुंबलेल्या गटारी असे चित्र पाहावयास मिळत आहे.
दैनिकांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतरही नगरपालिकेतील सत्तारूढ कॉँग्रेस व प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे भाजपचे शहर अध्यक्ष विलास
रानडे, जिल्हा सरचिटणीस धोंडिराम जावळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली नायकवडे, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग म्हातुकडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांना घेराव घातला.
आंदोलकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत प्रश्नांचा भडीमार करून चांगलेच धारेवर धरले. अधिकाऱ्यांकडे जुजबी उत्तरे देण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र,
दोन दिवसांत कचरा उठाव
करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात शहाजी भोसले, बाबासाहेब नलगे, दीपक पाटील, संतोष कोटगी, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
कारणे दाखवा नोटिसा
शहरातील कचरा उठाव होत नसल्याच्या कारणावरून आज, मंगळवारी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी अचानकपणे सकाळी शहरात फिरून वेळेवर कामासाठी उपस्थित नसणाऱ्या स्वच्छता निरीक्षक व कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. काही भागातील अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसाही बजावल्या.