रांगण्याच्या दरीत पडलेल्या इतर तोफा गडावर आणण्यासाठी सहकार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:24 IST2021-05-20T04:24:54+5:302021-05-20T04:24:54+5:30
बोरवडेः इसवी सन १८४४ च्या सुमारास गडकऱ्यांचे बंड दडपताना इंग्रजांनी ...

रांगण्याच्या दरीत पडलेल्या इतर तोफा गडावर आणण्यासाठी सहकार्य करावे
बोरवडेः इसवी सन १८४४ च्या सुमारास गडकऱ्यांचे बंड दडपताना इंग्रजांनी गडावरील तोफा सुमारे दोन हजार फूट दरीत ढकलल्या होत्या. सहा तोफांपैकी दोन तोफा शोधून त्या गडावर आणण्यात यश मिळाल्यानंतर उर्वरित चार तोफा शोधून काढण्यासाठी स्थानिक लोकांसह पुरातत्त्व खाते आणि गडप्रेमी अभ्यासक यांनी दरीतील वाटा शोधण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्रिवेणी रांगणा ग्रुपचे प्रमुख महादेव फराकटे आणि रांगणा शोधमोहीम सदस्य मावळ्यांनी केले आहे. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून बोरवडेच्या त्रिवेणी रांगणा ग्रुप मावळ्यांनी शोधमोहिमेस सुरुवात केली. अथक प्रयत्नांनंतर सुमारे दोन हजार फूट खोल दरीतून अडीच टन वजनाच्या आणि सरासरी नऊ फूट लांबीच्या दोन महाकाय तोफा १५ एप्रिल आणि २४ एप्रिलला त्रिवेणी रांगण्याच्या मावळ्यांनी किल्ल्यावर आणण्यात यश मिळविले होते. दरम्यान, या शोध मोहिमेतील प्रमुख मावळ्यांनी नुकतीच इतर तोफांच्या संदर्भात दरीत शोधमोहीम राबविली. परंतु, दरीतील नेमक्या वाटा लक्षात न आल्याने ही शोधमोहीम अर्धवट राहिली; पण स्थानिक लोकांसह गडप्रेमी अभ्यासक आणि पुरातत्त्व खात्याने याबाबतीत सहकार्य केल्यास निश्चितपणे पावसाच्या अगोदर एखादी दुसरी तोफ गडावर आणता येईल. काहीही झाले तरी पावसाळ्यापूर्वी शोधमोहीम राबवून तोफांचा शोध घेऊन त्या गडावर आणण्याचा चंग त्रिवेणी रांगणा मावळ्यांनी मनाशी बाळगला आहे.