गांधीनगर बाजारपेठेत कडकडीत बंद
By Admin | Updated: December 18, 2014 00:02 IST2014-12-17T23:26:48+5:302014-12-18T00:02:58+5:30
अशोक चंदवाणीवर कारवाई करा : व्यापारी वर्गाची मागणी; करोडोंची उलाढाल ठप्प

गांधीनगर बाजारपेठेत कडकडीत बंद
गांधीनगर : अशोक चंदवाणी यांच्याकडून खंडणीसाठी होणारा अन्याय व दहशतीच्या निषेधार्थ संपूर्ण गांधीनगर बाजारपेठेत आज, बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदचे आवाहन होलसेल व्यापारी असोसिएशन व रिटेल व्यापारी असोसिएशनसह व्यापारी वर्गाच्यावतीने करण्यात आले होते. एका व्यक्तीविरुद्ध गांधीनगर बाजारपेठ बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सकाळी अकरा वाजता होलसेल व रिटेल व्यापारी सिंधी सेंट्रल पंचायतीजवळ एकत्र आले. त्यांनी अशोक चंदवाणी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. खासगी मालमत्तेत कोणतेही हितसंबंध नसताना कायदेशीर डावपेचात अडकवून खंडणी मागणाऱ्या अशोक चंदवाणीस जिल्ह्यातून हद्दपार करा, अशा घोषणा देण्यात येत होत्या. होलसेल व रिटेल व्यापारी असो.चे पदाधिकारी व व्यापारी प्रतिनिधींच्या आवाहनानुसार गांधीनगर बाजारपेठ बंद राहिली.
तावडे हॉटेल परिसर, गांधीनगर मेनरोडवरील सर्व दुकाने बंद राहिली. स्वस्तिक मार्केट, गजानन मार्केट, झुलेलाल मार्केट, फुटवअर मार्केट, सिंधू मार्केट, गुरुनानक मार्केट, आदी बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद राहिली. बंद अचानक जाहीर झाल्याने ग्राहकांची मात्र गैरसोय झाली.
गांधीनगर पोलीस ठाण्यातही अशोक चंदवाणीच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी निवेदन दिले. तेथेही व्यापाऱ्यांनी अशोक चंदवाणीवर कारवाईची मागणी केली. दरम्यान, गांधीनगर परिसरातील खंडणीबहाद्दरांचा व्यापाऱ्यांना धोका निर्माण झाला असून, त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, त्यांना जिल्ह्णातून हद्दपार करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन गांधीनगर येथील शंभरहून अधिक व्यापाऱ्यांनी आज, बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने गेले. दरम्यान, सिंधी सेंट्रल पंचायतजवळ जमलेल्या प्रमुख व्यापाऱ्यांमध्ये सुरेश ऊर्फ पप्पू आहुजा, मुरली रहंदीमल खूबचंदाणी, संदीप आहुजा, संजय चुहा, रमेश वाधवाणी, मनोज बचवानी, गुलशन आहुजा, दिनेश दुल्हानी, विनोद दुल्हानी, सुंदर कलानी, रावसाहेब जगताप, अमर शेटके, आदी सहभागी झाले होते.
करोडोंची उलाढाल ठप्प
मुंबई बाजारपेठेखालोखाल गांधीनगर बाजारपेठ उलाढालीमध्ये प्रसिद्ध आहे. बंदमुळे सर्व होलसेल व रिटेल दुकाने बंद राहिली. सर्व व्यवहार बंद राहिल्याने करोडोंची उलाढाल ठप्प झाली. इलेक्ट्रॉनिक्स, कटलरी, फुटवेअर, कापड, रेडिमेड वस्त्र, ट्रान्स्पोर्ट कंपन्या बंद राहिल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले.