ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना धोका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:28 IST2021-09-09T04:28:21+5:302021-09-09T04:28:21+5:30
कोल्हापूर : सतत पडणारा पाऊस आणि ढगाळ वातावरण, हवेतील आर्द्रता आणि वाढते प्रदूषण याचा सर्वाधिक त्रास अस्थमा रुग्णांना बसत ...

ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना धोका !
कोल्हापूर : सतत पडणारा पाऊस आणि ढगाळ वातावरण, हवेतील आर्द्रता आणि वाढते प्रदूषण याचा सर्वाधिक त्रास अस्थमा रुग्णांना बसत आहे.
सातत्याने पडणारा पाऊस, थंडी आणि ढगाळ वातावरण हे सर्व अस्थमा (दमा) असलेल्या रुग्णांकरिता घातक आहे. त्यामुळे असे वातावरण सातत्याने राहिल्यास इतर आजारही बळावतात. ज्यांना जुना अस्थमा आहे अशा रुग्णांनी सातत्याने यावरील औषधी घेणे अत्यावश्यक बनते. विशेषत: कोरोना संसर्गात अनेकांची इम्युनिटी कमी झाली आहे. त्यामुळे इम्युनिटी कमी होणे म्हणजे इतर आजारांना निमंत्रण ठरणारे आहे. विशेषत: जे जुने अस्थामाचे रुग्ण आहेत त्यांना सर्वाधिक त्रास होत आहे. त्यामुळे अगदी फॅमिली डाॅक्टर ते मोठ्या रुग्णालयात यावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही समस्या ज्येष्ठांमध्ये अधिक आहे. यावर उपाय म्हणजे अशा वातावरणात घरातून बाहेर न पडणे, नियमित औषधोपचार घेणे, रोजचा व्यायाम करणे आदी काळजी घेतल्यास हेही रुग्ण निरोगी राहू शकतात. वेळच्या वेळी डाॅक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.
प्रतिकारशक्ती कमकुवत
श्वसनाशी संबंधित असलेल्या अस्थमा (दमा) आजारांमध्ये संबंधित रुग्णांची प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) कमी होते. त्यामुळे रुग्णांना इतर आजार होण्याची शक्यता अधिक असते. विशेष म्हणजे विषाणूचा धोका अधिक असतो. असे संशोधनातूनही पुढे आले आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
बालकेही अस्थामांची शिकार
हा रोग केवळ ज्येष्ठांना होत नाही तर बालकांनाही होऊ शकतो. विशेष म्हणजे आनुवंशिकता, वाढते प्रदूषण, एखादा वस्तू, पदार्थ, धूळ आदींची ॲलर्जी याला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे पालकांनी अशा मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.
ही घ्या काळजी ...
अशा रुग्णांनी या काळात घरातून बाहेर पडू नये. गरम कपडे घालावेत. ज्यांना जुना अस्थमा असलेल्या रुग्णांनी डाॅक्टरांचा सल्ला सातत्याने घेणे आवश्यक आहे. थंड वाऱ्यात अथवा गर्दीमध्ये फिरू नये. योग्य औषधोपचार, नियमित व्यायाम, सकस आहार अशी दैनंदिनी ठेवली तर हेही रुग्ण निरोगी जीवन जगू शकतात.
डाॅ. अजय केणी,
हृदययरोग तज्ज्ञ, कोल्हापूर