उपसाबंदी आली २२ दिवसांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 00:30 IST2015-12-29T23:47:52+5:302015-12-30T00:30:07+5:30
उपसाबंदी शिथिल : रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी उपाय

उपसाबंदी आली २२ दिवसांवर
गडहिंग्लज : गडहिंग्लज व आजरा तालुक्यांतील रब्बी हंगामातील उभी पिके वाचविण्यासाठी हिरण्यकेशी नदीवरील शेतीच्या पाण्यासाठीची उपसाबंदी अखेर ३४ दिवसांवरून २२ दिवसांवर आणण्यात आली.
गडहिंग्लज तालुक्यातील यंदाची दुष्काळी स्थिती विचारात घेऊन उपसाबंदी कालावधी कमी करण्याची मागणी विविध पक्ष-संघटनांसह शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार उपासाबंदी कालावधी कमी करण्यात आला आहे. गडहिंग्लज पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी नंदकुमार मोरे यांनी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, ८ डिसेंबरला चित्री मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा १३३४ द.ल.घ.फू.इतका होता. त्यापैकी आपत्कालीन परिस्थितीसाठी तीनशे द.ल.घ.फू.इतका पाणीसाठा राखीव ठेवण्याची तरतूद प्रकल्पाच्या अहवालात आहे.
गडहिंग्लज व आजरा या दोन शहरांसह तालुक्यातील ६० ते ७० ग्रामपंचायतींच्या नळ पाणीपुरवठा योजना आणि मर्यादित स्वरूपात शेतीला पाणी पुरविण्यासाठी हिरण्यकेशी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर ३४ दिवस उपसाबंदी लागू करण्यात आली होती.
तथापि, उसासह रब्बी हंगामातील उभी पिके वाचविण्याच्या दृष्टिकोनातून उपसाबंदी कालावधी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ जानेवारीपर्यंत उपसाबंदी लागू राहील. त्यानंतर प्रकल्पातील पाणीसाठा आणि कार्यक्षेत्रीय परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील उपसाबंदी कालावधी निश्चित करणार आहे, असेही पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)