गांधीनगर येथे पुतळा उभारल्यावरून बंद
By Admin | Updated: May 12, 2015 00:41 IST2015-05-12T00:38:29+5:302015-05-12T00:41:14+5:30
वादग्रस्त जागेत अज्ञाताचे कृत्य : पुतळा सन्मानपूर्वक हटवण्याची मागणी

गांधीनगर येथे पुतळा उभारल्यावरून बंद
गांधीनगर : गांधीनगरमधील मध्यवर्ती सिरू चौकातील वादग्रस्त जागेत काही अज्ञातांनी सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केल्याने त्याचे पडसाद संपूर्ण गांधीनगरसह बाजारपेठेत उमटले. हा पुतळा सन्मानपूर्वक हलविण्यासाठी विविध संघटनांनी सोमवारी बेमुदत बंद पुकारला. संपूर्ण गांधीनगरमध्ये तणावपूर्ण शांतता होती. दंगल नियंत्रण पथकासह मोठा पोलीस बंदोबस्त होता.
सिरू चौकातील एका वादग्रस्त भूखंडावर एका बाजूला माता मंदिर आहे. त्याच्या दुसऱ्या बाजूला त्याच भूखंडातील जागेवर रिपब्लिकन पक्ष (आठवले) गटाच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरांच्या स्मारकासाठी आखणी केली आहे. सध्या हा वाद न्यायप्रविष्ट झाला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून येथे पोलीस बंदोबस्त तैनात आहे. न्यायालयाने या भूखंडाबाबत ‘जैसे थे’चा आदेश केला आहे. बऱ्याच दिवसापासून येथे पुतळा उभारण्याची शक्यता वर्तवली जात होती. मध्यंतरीच्या काळात या वादग्रस्त जागेत पुतळा उभा केला जाणार अशी कुणकुण पोलिसांना लागली होती. त्यावेळी पोलीस बंदोबस्त वाढवला होता. मात्र, हे वातावरण निवळताच सोमवारी पहाटे पाचच्या दरम्यान अज्ञातांनी तेथे पोलीस नसल्याची संधी साधत पुतळा उभा केला.
या घटनेने संपूर्ण गांधीनगरमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. डॉ. आंबेडकरविरोधी नाही पण प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तेथे अज्ञातांनी पुतळा उभा करून समाजामध्ये तेढ निर्माण केल्याची प्रतिक्रिया सिंधी समाजातून व्यक्त होत होत्या. दरम्यान, करवीरचे पोलीस उपअधीक्षक अमरसिंह जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ केली. घटनेच्या गांभीर्यामुळे दंगल नियंत्रण पथकास पाचारण केले.
सिंधी सेंट्रल पंचायतमध्ये गांधीनगरवासीय जमले. तेथे होलसेल व्यापारी असोसिएशन, रिटेल व्यापारी असोसिएशन, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची ग्रामस्थांसमवेत बैठक झाली. त्यात गांधीनगर सोमवारपासूनच बेमुदत बंद करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार भारतीय सिंधू सभेचे कार्यकर्ते बंदचे आवाहन करत प्रमुख मार्गावरून फिरत होते. बंद करण्यावरून व्यापारी व कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. अचानक बंद करू नका, अशी व्यापारी विनंती करत होते.
हवालदार परशराम जोगानी यांना पुतळा उभा केल्याचे घटनास्थळी आल्यानंतर समजताच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना गांधीनगर वसाहत रुग्णालयात हलवण्यात आले. अत्यंत प्रामाणिक पोलीस म्हणून त्यांची पोलिसांत ओळख आहे. पण पर्यायी पोलीस घटनास्थळी सेवेत नसल्याने प्रात:र्विधीसाठी त्यांना घटनास्थळावरून पोलीस ठाण्याकडे जावे लागले. जर पर्यायी व्यवस्था झाली असती तर पुतळा उभा राहिला नसता. रिपब्लिकन पक्ष (आठवले) गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्याशी पोलीस उपअधीक्षक जाधव यांनी चर्चा केली. सिंधी सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष भजनलाल डेंबडा, प्रीतम चंदवाणी, उपसरपंच गुड्डू सचदेव, प्रताप चंदवाणी, प्रेम लालवाणी यांनीही जाधव यांच्याशी चर्चा केली पण दोन्ही बाजूकडून तोडगा निघू शकला नसल्याचे जाधव यांनी सांगितले. (वार्ताहर)
वार्ताहर
बंदबाबत वादावादी
सध्या लग्नसराई आहे. त्यामुळे बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी आहे. कार्यकर्ते बंदचे आवाहन करीत होते. त्यावेळी व्यापारी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवत होते. दुकानदार, व्यापारी व कर्मचारी अन् कार्यकर्त्यांत वाद झाले. किमान दुकानात आलेले गिऱ्हाईक तरी करू देत, अशी विनवणी व्यापारी करीत होते. त्यामुळे बंदचे आवाहन करणारे कार्यकर्ते पुढे जाताच दुकानात व्यापार चालू राहिला. त्यामुळे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.