खासगी इंग्रजी शाळांकडून ऑनलाईन शिक्षण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:17 IST2021-07-08T04:17:11+5:302021-07-08T04:17:11+5:30
कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी इंग्लिश मीडियम स्कूल ट्रस्टीज असोसिएशन आणि इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनने एक दिवस ऑनलाईन शिक्षण ...

खासगी इंग्रजी शाळांकडून ऑनलाईन शिक्षण बंद
कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी इंग्लिश मीडियम स्कूल ट्रस्टीज असोसिएशन आणि इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनने एक दिवस ऑनलाईन शिक्षण बंद आंदोलनाची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्ह्यातील ३४१ खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी हे शिक्षण बंद ठेवले.
राज्य शासनाने आरटीई २५ टक्के प्रवेशित विद्यार्थ्याचा चार वर्षांचा सन २०१७-१८ ते २०२०-२१ पर्यंतचा थकीत आरटीई परतावा विनाशर्त २४ मे २०१२ कलम १२ (ड) उपकलम एक व दोन महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ अधिनियमानुसार राज्यातील शाळांना तातडीने द्यावा. शासनाने वर्ष सन २०२०-२१ करिता आरटीई २५ टक्के प्रवेशित विद्यार्थी दर आठ हजार करण्याबाबतचे पत्रक रद्द करून केंद्र सरकारने ठरवून दिलेले, २६ हजार ९०८ रुपये आणि गणवेशाचे ११०० रुपये हा दर समान विनाअट लागू करणे. शाळा सुरू करण्यास धोरण ठरवावे, आदी मागण्यांसाठी या इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून एकदिवसीय ऑनलाईन शिक्षण बंद आंदोलन करण्यात आले. बहुतांश शाळांनी मंगळवारी, तर उर्वरित शाळांनी बुधवारी हे आंदोलन केले असल्याची माहिती इंग्लिश मीडियम स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष के. डी. पाटील यांनी दिली. राज्य पातळीवर आंदोलन करण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने आरटीईच्या प्रतिपूर्ती रक्कम देण्यासाठी दोनशे कोटी रुपये मंजूर केले आहेत. ही रक्कम मिळाल्यास शाळांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष महेश पोळ यांनी बुधवारी दिली.