बंदला संमिश्र प्रतिसाद; ११३९ शाळा राहिल्या बंद
By Admin | Updated: December 10, 2015 01:30 IST2015-12-10T01:14:03+5:302015-12-10T01:30:51+5:30
प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन : विद्यार्थांना सुटी; विभागांतील १९९६ शाळांचा सहभाग

बंदला संमिश्र प्रतिसाद; ११३९ शाळा राहिल्या बंद
कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसह अशैक्षणिक धोरणांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समिती आणि कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे पुकारण्यात आलेल्या ‘शाळा बंद’ आंदोलनामुळे बुधवारी विद्यार्थ्यांना सुटी मिळाली. बहुतांश संस्थांनी पूर्वनियोजनानुसार आपल्या माध्यमिक, प्राथमिक खासगी व कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवली. मात्र, जिल्हा परिषदेच्या आणि सीबीएसई, आयसीएससी या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा सुरू होत्या. जिल्ह्यातील एकूण प्राथमिक व माध्यमिक ३०४७ शाळांपैकी ११३९ शाळा बंदमध्ये सहभागी झाल्या.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अहवाल त्वरित मान्य करा. वेतनेतर अनुदान सर्व माध्यमिक शाळांना पूर्वीप्रमाणेच द्या. अनुदानास पात्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व वर्ग तुकड्यांना त्वरित अनुदान द्या. २८ आॅगस्ट २०१५ च्या संचमान्यतेचा शासननिर्णय रद्द करा, अशा शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थाचालकांच्या विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. त्यासह शासनाच्या अशैक्षणिक धोरणांचा राज्यातील शिक्षणक्षेत्राला त्रास होत आहे. या अशैक्षणिक धोरणांना विरोध आणि प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी समिती व व्यासपीठाने ‘घंटा नाद आंदोलन’, ‘झोप मोड आंदोलन व मोर्चा’ अशी आंदोलने केली.
मात्र, त्याचा सरकारवर काहीच परिणाम झाला आहे. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढवून प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे बुधवारी आणि गुरुवारी (दि. १०) ‘शाळा बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. व्यासपीठाने दिलेल्या बंदच्या हाकेला शाळांनी साथ दिली. त्यानुसार जिल्ह्यातील १३९ खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवल्याने या शाळा, महाविद्यालयांतील सुमारे १५ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींना सुटी मिळाली. त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये शुकशुकाट पसरला होता.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न वेगळे असल्याने त्या शाळा सुरू होत्या. त्यामुळे संबंधित शाळा नेहमीप्रमाणे सुरू होत्या.
दरम्यान, बंदबाबत शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड म्हणाले, सीबीएसई, आयसीएसई आणि जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या शाळावगळता अन्य शाळा बंदमध्ये सहभागी झाल्या. बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. गुरुवारी बंद पाळला जाणार आहे. शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी म्हणाले, कोल्हापूर विभागात प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण १४४२७ शाळा असून त्यापैकी १९९६ शाळा बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)
कोल्हापूर विभागातील बंदमधील सहभागी शाळा अशा
जिल्हाप्राथमिकमाध्यमिक
कोल्हापूर२२४९१५
सांगली३८ ३२५
सातारा -२७५
रत्नागिरी-२
सिंधुदुर्ग१ २१६
इचलकरंजीतील
४९ शाळा सहभागी
इचलकरंजी : विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपामध्ये शहरातील ४९ शाळांनी सहभाग नोंदविला. या शाळा आज, गुरुवारीसुद्धा संपामध्ये सहभागी होणार आहेत. राज्यातील माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांच्या शासनाकडे विविध मागण्या आहेत.बुधवारी व आज संपाचे आंदोलन केले आहे. त्यामध्ये इचलकरंजीतील मराठी व इंग्रजी माध्यमांच्या ४९ शाळांनी सहभाग नोंदविला.