मेट्रो पार्कची वीज, पाणी तीन दिवसांत बंद करा
By Admin | Updated: May 22, 2015 00:55 IST2015-05-22T00:51:33+5:302015-05-22T00:55:38+5:30
प्रदूषण नियंत्रणचा दणका : रसायनमिश्रित पाणी सोडल्याचे कारण

मेट्रो पार्कची वीज, पाणी तीन दिवसांत बंद करा
कोल्हापूर : कागलनजीकच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्क आणि समर्पक कोरुगेटेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे वीज आणि पाणी कनेक्शन ७२ तासांत बंद करण्याचा आदेश येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर यांनी गुरुवारी दिला. रसायनमिश्रित पाणी सोडून जलस्रोत दूषित केल्याच्या कारणावरून ही कारवाई झाली आहे. जिल्ह्णात पहिल्यांदाच प्रदूषणसंबंधी इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योजकांना ‘प्रदूषण’ने दणका दिल्यामुळे खळबळ माजली आहे.
उच्च न्यायालयात पंचगंगा प्रदूषणासंबंधी जनहित याचिका झाली आहे. सुनावणीवेळी न्यायालयाने प्रदूषणकारी घटकांवर थेट कारवाई का केली जात नाही, असा सवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाला यापूर्वी अनेक वेळा विचारला आहे. त्यामुळे ‘प्रदूषण’चे प्रशासन अलीकडे सक्रिय झाले आहे. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्कमध्ये लहान-मोेठे असे एकूण दहा ते बारा उद्योग आहेत. पार्कमधील रसायनमिश्रित पाणी १२ मे रोजी बाहेर सोडण्यात आले. ते कसबा सांगाव (ता. कागल) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दूधगंगा कालव्यामध्ये मिसळत असल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले.
रहिवाशांनी त्वरित प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना बोलावून पंचनामा करण्यास भाग पाडले. रसायनमिश्रित पाणी बाहेर सोडलेली जागाही दाखविली होती. मात्र ‘प्रदूषण’च्या प्रशासनाने केलेल्या पाहणीत नेमक्या कोणत्या कारखान्याने रसायनमिश्रित पाणी सोडले आहे, हे स्पष्ट झाले नाही. त्यामुळे संपूर्ण पार्कची व प्रक्रिया न करता वापरलेले रसायनमिश्रित पाणी बाहेर सोडल्याप्रकरणी समर्पक कोरूगेटेड प्रा. लिमिटेडची पाणी, वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई
करावी, असा अहवाल मुख्य कार्यालयाकडे आठ दिवसांपूर्वी पाठविला होता.
याबाबत कारवाई करावी, यासाठी मंगळवारी (दि. १९) शिवसेनेने ‘प्रदूषण’च्या कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे प्रदूषणाच्या प्रशासनास जाग आली. कारवाईचा आदेश काढला. वीज कनेक्शन तोडण्याचा आदेश वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आणि पाणीपुरवठा बंद करण्याचा आदेश औद्योगिक विकास महामंडळाचे (कागल-हातकणगंले) कार्यकारी अभियंता यांना दिला आहे. (प्रतिनिधी)
कारवाई का ?
टेक्स्टाईल पार्कमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार हवा, पाणी यांचे प्रदूषण पूर्णपणे रोखण्यासाठी उपाययोजना केलेल्या नाहीत. रसायनमिश्रित पाणी सोडून जलस्रोत दूषित केले, टेक्स्टाईल पार्कमधील प्रत्येक उद्योगाने सांडपाण्यावर काय प्रक्रिया केली जाते, यासंबंधी माहिती दिली नाही. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केलेले नाहीत, मेट्रो पार्कमध्ये नियमाप्रमाणे ३३ टक्के जागेत वृक्षलागवड केलेली नाही, या कारणांसाठी पार्कवर, तर औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित नसणे, औद्योगिक सांडपाणी उघड्यावर सोडणे, उत्पादन तयार करण्यासाठी विनापरवाना वूड फायरड आणि थर्मिक फ्लूड हिटर बॉयलर बसविले या प्रमुख कारणांमुळे ‘समर्पक’ कंपनीवर कारवाई झाली आहे.
कारवाईनंतर पुढे काय ?
वीज, पाणी कनेक्शन तोडल्याची कारवाई झाल्यानंतर पार्क व ‘समर्पक’ कंपनीची सुनावणी मुंबई येथे प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात होणार आहे.
सुनावणीत सर्व त्रुटी किती दिवसांत पूर्ण करणार यासंबंधी विचारणा केली जाणार आहे. उद्योजकांचीही बाजू ऐकून घेतली जाणार आहे.
त्यानंतर दिलेले हमीपत्र प्रदूषण मंडळास मान्य झाल्यास वीज, पाणी कनेक्शन पूर्ववत जोडले जाणार आहे.