शिरोळमधील अवैध दारुविक्री बंद करा
By Admin | Updated: July 1, 2015 00:24 IST2015-07-01T00:24:12+5:302015-07-01T00:24:12+5:30
महिला आक्रमक : नायब तहसीलदारांना बांधल्या राख्या

शिरोळमधील अवैध दारुविक्री बंद करा
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाच्या महिला आघाडीच्यावतीने तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार वैभव पिलारी यांना राख्या बांधून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.मंगळवारी दुपारी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मीना आवळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी शिरोळ तालुक्यातील गावठी दारू विक्री बंद करावी, यासाठी आंदोलन केले. मुंबई-मालवणीमध्ये विषारी दारूमुळे १०४ जणांचा मृत्यू झाला. अशी परिस्थिती तालुक्यात होऊ नये, यासाठी शासनाने गावठी दारू बंद करावी, या मागणीसाठी महिलांनी नायब तहसीलदार वैभव पिलारी यांना राख्या बांधून, ओवाळणी म्हणून बंदी आणावी, अशी मागणी केली. यावेळी पिलारी यांनी गावठी दारू बंद करण्याच्या सूचना उत्पादन शुल्क कार्यालय कोल्हापूर, शिरोळ, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिल्या असल्याचे सांगितले.आंदोलनात ललिता गदडे, सुवर्णा वाघमारे, सानिका सांगावकर, अलका भोसले, रेखा कुरणे, वैशाली व्हावाळे, मंदाकिनी कुलकर्णी, वासंती देवकुळे, शुभांगी कांबळे, सुषमा कांबळे, राणी चव्हाण, भारती सरनाईक, अप्सरा मुल्ला यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या. ( प्रतिनिधी )