क्लिक करा, कोल्हापूरचे सौंदर्य
By Admin | Updated: August 8, 2014 00:38 IST2014-08-07T23:52:39+5:302014-08-08T00:38:49+5:30
‘लोकमत’तर्फे छायाचित्र स्पर्धा : हौशी व व्यावसायिक छायाचित्रकारांना संधी

क्लिक करा, कोल्हापूरचे सौंदर्य
कोल्हापूर : कोल्हापूर म्हणजे निसर्गाने दिलेले वरदान. बारमाही वाहणाऱ्या नद्या, पन्हाळा, गगनबावडा यांसारखे हिल स्टेशन, पश्चिम घाटातील जैवविविधता, अभयारण्य, या कडेकपारीतल्या सौंदर्याने, स्थळांनी ही भूमी समृद्ध झाली आहे. धार्मिकदृष्ट्या देशातील महत्त्वाचे श्रद्धास्थान असलेल्या या जिल्ह्याला शाहू राजांच्या पुण्याईचा स्पर्श आहे, तर हिरवाईने नटलेल्या या परिसराला ऐतिहासिक स्थळांनी आणि वास्तूंनी शिरपेच चढविला आहे. आपल्या या कोल्हापूरचे अलौकिक सौंदर्य टिपण्यासाठी ‘लोकमत उमंग’ अंतर्गत व राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या विद्यमाने छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त होणाऱ्या या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गस्थळे/पर्यटनस्थळे असा विषय देण्यात आला आहे. यात निवडल्या गेलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन शाहू स्मारक भवनच्या कलादालनात १९ व २० आॅगस्टला होईल.
स्पर्धा हौशी व व्यावसायिक अशा दोन गटांत होणार आहे. त्यातील छायाचित्राचा आकार ८ बाय १२ इंच असावा व त्याला पांढऱ्या रंगातील माऊंट असावेत. स्पर्धकांनी छायाचित्रास योग्य ते शीर्षक द्यावे व त्यामागे आपले नाव लिहावे. छायाचित्रावर कोणतेही संगणकीय काम केलेले नसावे. छायाचित्र स्पर्धेसाठी निवडण्याचा अधिकार निवड समितीचा असणार आहे, तर परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेसाठी निवडलेली ही छायाचित्रे या प्रदर्शनात लावली जातील.
स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला तीन हजार रुपयांचे, द्वितीय क्रमांक विजेत्यास दोन हजारांचे, तर तृतीय क्रमांक विजेत्यास एक हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. याशिवाय दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत. तरी इच्छुकांनी आपले छायाचित्र दि. १७ आॅगस्टपर्यंत ‘लोकमत’च्या लक्ष्मीपुरी, कोंडाओळ येथील कार्यालयात जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाला सामाजिक कार्याची झालर देत, प्रदर्शनात मांडल्या गेलेल्या छायाचित्रांच्या विक्रीतून मिळणाऱ्या निधीतील रक्कम ‘स्वयंम स्कूल फॉर स्पेशल चाईल्ड’ या संस्थेला देण्यात येणार आहे.
तुम्ही कॅमेराबद्ध केलेले कोल्हापूरचे सौंदर्य मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या गरजू संस्थेला मोलाचे अर्थसाहाय्य करेल.