लिपिक सुप्रिया शिंदे यांच्या निलंबनाचे आदेश थेट घरात
By Admin | Updated: October 16, 2015 00:02 IST2015-10-15T23:42:26+5:302015-10-16T00:02:01+5:30
डीडी गहाळ प्रकरण : प्रशासनाकडून गंभीर दखल; आणखी काही रडारवर

लिपिक सुप्रिया शिंदे यांच्या निलंबनाचे आदेश थेट घरात
कोल्हापूर : पोरेवाडी (ता. चंदगड) येथील नितीश तुकाराम पाटील यांच्या वारसांना मस्कत प्रशासनाकडून पाठविलेला नुकसानभरपाईचा २३ लाख ३९ हजारांचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) गहाळप्रकरणी लिपिक सुप्रिया शिंदे यांच्या निलंबनाचे आदेश गुरुवारी त्यांच्या घरच्या पत्त्यावर पोस्टाने पाठविण्यात आले आहेत. ही कारवाई एवढ्यापुरतीच मर्यादित न राहता संबंधित अव्वल कारकून व तहसीलदारांवरही करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.डीडी गहाळ प्रकरण जिल्हा प्रशासनाने चांगलेच गांभीर्याने घेतले आहे. गुरुवारी संबंधितांवर निलंबनाचे आदेश लागू होऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याचे प्रसारमाध्यमांमधून समोर आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने निलंबनाचे आदेश थेट लिपिक शिंदे यांच्या घरच्या पत्त्यावर पोस्टाने पाठविले. लिपिक शिंदे या दोन दिवसांपासून कार्यालयात आलेल्या नाहीत. तसेच सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदार सुनीता नेर्लीकरही दोन दिवस कार्यालयाकडे फिरकलेल्या नाहीत. त्यामुळे गोंधळ वाढला आहे. वास्तविक सर्वसाधारण शाखेच्या प्रमुख म्हणून त्यांच्याकडून हे आदेश यापूर्वीच संबंधितांना लागू करणे अपेक्षित होते; परंतु ते न झाल्याने व प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न उचलून धरल्याने निलंबनाचे घरच्या पत्त्यावर पाठविण्यात आले. तहसीलदारांनी ज्या-त्यावेळी हा डीडी भरला असता तर ही वेळ आली नसती, अशी चर्चाही या ठिकाणी सुरू आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा प्रशासनाकडून पोलिसांत नोंद
कोल्हापूर : पोरेवाडी (ता. चंदगड) येथील नितीश तुकाराम पाटील यांच्या वारसांना मस्कत प्रशासनाने पाठविलेला नुकसानभरपाईचा २३ लाख ३९ हजारांचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) गहाळ झाल्याप्रकरणी गुरुवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार प्रकाश दगडे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद केली. निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी या प्रकरणात नायब तहसीलदार दगडे यांना प्राधिकृत केले आहे.
नितीश यांच्या वारसांना पैसे मिळवून देण्यासाठी मस्कत दूतावासाला सोमवारी (दि. १२) पत्र पाठवून पैसे परत देण्याची विनंती करण्यात आली आहे. त्याचबरोबर डीडी गहाळप्रकरणी सर्वसाधारण शाखेतील लिपिक सुप्रिया शिंदे यांच्या घरच्या पत्त्यावर निलंबनाचे आदेश गुरुवारी पाठविण्यात आले आहेत.
- शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी
या ‘डीडी’चा गैरवापर झाला असता तर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असता; परंतु त्याचा गैरवापर झालेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार त्यांना ‘डीडी’ गहाळ नोंद करण्यात आली असून, त्याप्रमाणे त्यांना याबाबतचा दाखला देण्यात आला.
-अरविंद चौधरी, पोलीस निरीक्षक, शाहूपुरी पोलीस ठाणे