स्वच्छता कर्मचाऱ्यांची होणार आरोग्य तपासणी
By Admin | Updated: January 13, 2015 00:13 IST2015-01-12T23:48:58+5:302015-01-13T00:13:23+5:30
दिलीप पाटील : साधनसामग्रीचा वापर सक्तीचा --लोकमतचा प्रभाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांची होणार आरोग्य तपासणी
कोल्हापूर : शहराच्या स्वच्छतेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून कचरा उठाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दर सहा महिन्यांतून आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना कचरा उठाव करताना प्रशासनाने स्वसंरक्षणासाठी दिलेल्या साधनसामग्रीचा वापर करण्याची सक्ती करण्यात आल्याचे महापालिका आरोग्यधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले.
महापालिका प्रशासन विभागातील ‘स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनात खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांना दुर्गंधीयुक्त, सडलेला, कचरा उठाव करताना हातांना ग्लोव्हज्, चेहऱ्याला मास्क, पायात गमबूट, प्लास्टिकचा कोट अथवा गाऊन अशी साधनसामग्रीची पूर्तता केली असतानाही ते वापरत नसल्याचे प्रशासनाने सांगितले. कचरा उठाव करताना या साधनसामग्रीचा वापर करण्यास सक्ती करण्यात आली असून विना साधनसामग्रीचे कोणी कर्मचारी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दर सहा महिन्यांनी आरोग्य शिबिर आयोजित करून कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.