‘स्वच्छ भारत’चा कुरुंदवाडला पुरस्कार
By Admin | Updated: September 6, 2016 23:49 IST2016-09-06T23:39:11+5:302016-09-06T23:49:34+5:30
विमल जोंग यांचा सत्कार : शहर शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्याने निवड

‘स्वच्छ भारत’चा कुरुंदवाडला पुरस्कार
कुरुंदवाड : राज्य शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाचा येथील पालिकेला पुरस्कार मिळाल्याबद्दल एन.डी.टी.व्ही. व राज्य शासन यांच्यावतीने मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बीग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते नगराध्यक्ष विमल जोंग यांचा सत्कार करण्यात आला.
येथील पालिकेने स्वच्छ भारत अभियानात भाग घेवून शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी वैयक्तिक शौचालयासाठी अनुदान, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याबरोबरच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली होती. नियमांचे पालन न करणाऱ्यांना पालिकेच्या गुडमॉर्निंग पथकाने फौजदारी कारवाई केली होती. त्यामुळे शहर शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्याने राज्य शासनाच्या वतीने निवडलेल्या निवडक नगरपरिषदांमध्ये कुरुंदवाड नगरपालिकेचा समावेश होता.
एन.डी.टी.व्ही व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हागणदारीमुक्त झालेल्या नगरपरिषद नगराध्यक्षांचा मुंबई येथे सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य नगररचना सचिव मनीषा म्हैसकर यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष जोंग यांच्यासोबत नगरसेवक दादासो पाटील, आप्पासो जोंग, अलका पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
स्वच्छ भारत अभियानाचा कुरूंदवाडला पुरस्कार मिळाल्याबद्दल कुरुंदवाडच्या नगराध्यक्ष विमल जोंग यांचा अमिताभ बच्चन यांच्याहस्ते सत्कार झाला.