कोरोनाने मृत पावलेल्या वर्गमित्राच्या कुटुंबीयांसाठी वर्गमित्र आले धावून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:18 IST2021-06-03T04:18:23+5:302021-06-03T04:18:23+5:30
# नेसरीच्या १९८८ दहावी बॅचचे विधायक कार्य रवींद्र हिडदुगी नेसरी : कोरोनाने निधन झालेल्या येथील अनंत पांडुरंग नाईक यांच्या ...

कोरोनाने मृत पावलेल्या वर्गमित्राच्या कुटुंबीयांसाठी वर्गमित्र आले धावून
# नेसरीच्या १९८८ दहावी बॅचचे विधायक कार्य
रवींद्र हिडदुगी
नेसरी : कोरोनाने निधन झालेल्या येथील अनंत पांडुरंग नाईक यांच्या कुटुंबीयांना येथील एसपीजी हायस्कूलमधील १९८८ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जिवलग वर्गमित्राच्या कुटुंबीयाना ५५,५०० रुपयांची आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या आर्थिक मदतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. कोरोनाच्या या महामारीत अनेकांनी आपली हक्काची माणसं गमावली आहेत.
याचा मोठा फटका येथील नाईक कुटुंबीयांनाही बसला. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात अनंत नाईक यांचे वडील पांडुरंग नाईक यांचा अल्पशा आजाराने मृत्यु झाला. तर मुलगा अनंत नाईक यांचे लगेचच ७ ऑक्टोबर २०२० रोजी कोरोनाने निधन झाले. त्यामुळे या कुटुंबावर मोठा आघात झाला. अनंत नाईक हे राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. त्यांच्या अकस्मात जाण्याने शेती व घरकाम करणार्या पत्नीला घरखर्च व शिक्षण घेत असलेली मुलगी व मुलगा यांच्या खर्चासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या मोठी मुलगी बीएससी कॉम्पुटर तर मुलगा शिवराज हा आयटीआयचे शिक्षण घेत आहे. या कठीण समयी एसपीजी हायस्कूल येथील १९८८ सालच्या बॅचच्या वर्गमित्रांनी अनेकांकडून एकमेकांचे फोन नंबर मिळवत आपला व्हाॅट्सअॅप ग्रुप काढत एकमेकांच्या संपर्कात येऊन मदतीचे आवाहन केले. त्याला यश येऊन फुल ना फुलाची पाकळी म्हणत अर्धा लाखाहून अधिक रक्कम जमा झालेल्या रकमेची ठेव पावती करून. सदरची पावती शिक्षक एम. एस. तेली यांच्या हस्ते मुलगा शिवराजकडे सुपूर्त केली. यावेळी संदीप पाटील, आनंद सुतार, अनिल भालेकर, यशवंत देसाई आदी उपस्थित होते.
--------------------
फोटो ओळी.
कोरोणाने आधारवड हरपलेल्या नेसरीतील नाईक कुटुंबीयांना ५५,५०० रुपयांची आर्थिक मदतीची ठेव पावती प्रदान करताना निवृत्त मुख्याध्यापक एम. एस. तेली, शिवराज नाईक, संदीप पाटील, आनंद सुतार, अनिल भालेकर, यशवंत देसाई आदी.