इचलकरंजीच्या नगराध्यक्षा, नगरअभियंता धारेवर - रस्त्यांचे पॅचवर्क, डांबरीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:07 IST2017-12-28T00:04:06+5:302017-12-28T00:07:54+5:30
इचलकरंजी : गेले वर्षभर वारंवार आश्वासने देऊनही गावभाग, झेंडा चौक, नदीवेस, टाकवडे वेस अशा व्यापक

इचलकरंजीच्या नगराध्यक्षा, नगरअभियंता धारेवर - रस्त्यांचे पॅचवर्क, डांबरीकरणाची मागणी
इचलकरंजी : गेले वर्षभर वारंवार आश्वासने देऊनही गावभाग, झेंडा चौक, नदीवेस, टाकवडे वेस अशा व्यापक परिसरातील खड्डेमय रस्त्यांचे पॅचवर्क व डांबरीकरण रखडले आहे. पॅचवर्क व डांबरीकरण त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी आजी-माजी नगरसेवक व व्हिजन इचलकरंजी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षा अॅड. अलका स्वामी व नगरअभियंता बापूसाहेब चौधरी यांना धारेवर धरले.
रस्ते पॅचवर्कचे काम आज, गुरुवारपासून सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही देऊनही समाधान न झालेल्या आजी-माजी नगरसेवकांनी, शहरात इतरत्र रस्त्यांची कामे चालू आहेत; पण शहराचे गावठाण असलेल्या गावभागास डावलले जात असल्याचा आरोप केला. यावेळी मात्र नगराध्यक्षा स्वामी यांनी हस्तक्षेप करून पॅचवर्क व त्यापाठोपाठ डांबरीकरण होईल, असे सांगितले.
शहरातील गावभाग, झेंडा चौक, नदीवेस, टाकवडे वेस, श्रीपादनगर, ढोर वेस अशा व्यापक परिसरांमध्ये प्रमुख रस्ते व अंतर्गत छोटे-मोठे रस्ते खड्डेमय झाले आहेत. आॅक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. खड्ड्यांमध्ये टाकलेल्या मातीच्या मुरुमामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असून, त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार होत आहेत, तर दुचाकीधारक लहान-मोठ्या अपघाताबरोबर पाठीच्या व कंबरेच्या विकाराने त्रस्त झाले आहेत. म्हणून मागील आठवड्यामध्ये नगरसेवक सुनील तेलनाडे यांनी नगराध्यक्षांना निवेदन देऊन गावभाग परिसरातील रस्त्यांचे पॅचवर्क व डांबरीकरण त्वरित सुरू करावे, अशी मागणी केली होती.
बुधवारी नगरसेवक संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे, रवींद्र माने, माजी नगरसेवक बाळासाहेब कलागते, पापालाल मुजावर, व्हिजन इचलकरंजीचे दिलीप माणगावकर, उल्हास लेले, कौशिक मराठे, आदींसह नागरिक गावभागातील दत्तमंदिर येथे प्रमुख रस्त्यांवर जमले. त्यांनी नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व नगरअभियंता यांना तेथे येण्यास सांगितले; अन्यथा रास्ता रोकोचे जोरदार आंदोलन करण्याचा इशारा दिला. काही वेळानंतर नगराध्यक्षा अलका स्वामी, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे व नगरअभियंता बापूसाहेब चौधरी घटनास्थळी आले. दुरुस्तीसंदर्भात आजी-माजी नगरसेवकांबरोबर व्हिजन इचलकरंजीच्या पदाधिकाºयांनी अनेक प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडले.
अन्यथा शंखध्वनी, रास्ता रोको
रस्त्याचे पॅचवर्क करण्याचे काम आज, गुरुवारी सुरू झाले नसल्यास उद्या, शुक्रवारी गावभागातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्याचा इशारा दिला. तसेच व्हिजन इचलकरंजीच्यावतीने सुद्धा १ जानेवारी २०१८ ला शंखध्वनी व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.