कोल्हापूर : झूम येथील कचऱ्याच्या ढिगातून बाहेर पडणारा धूर आरोग्यास धोकादायक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आवश्यकतेनुसार मास्क घालूनच बाहेर पडावे, असा फतवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाने काढला आहे. वास्तविक महापालिकेवर या प्रकरणी कडक कारवाई न करता नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कॉमन मॅन संघटनेचे अॅड. बाबा इंदुलकर यांनी मंगळवारी झूम येथील विषारी वायूची तपासणी का करण्यात आली नाही, असा जाब प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांना विचारला. तातडीने तपासणी करून येथील दूषित वायूची माहिती सर्वांना जाहीर करण्याची मागणी केली. यानंतर कॉमन मॅन संघटना आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयानी झूम परिसराची पाहणी केली.
यानंतर प्रशांत गायकवाड यांनी कच-यातील आगीमुळे या ठिकाणी सल्फर डाय आॅक्साईड, नायट्रोजन डाय आॅक्साईड, पार्टिक्यूलेट मॅटर पीएम १०, लीड, कार्बन मोनॉक्साईड सी, अमोनिया अशी धुरातील संभाव्य प्रदूषके असू शकतात. यासंदर्भात महापालिकेला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, शिवाजी विद्यापीठातील पर्यावरण विभागातील मशिनरींच्या साहाय्याने झूम येथील वायूची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल येण्यास विलंब लागणार आहे. तरी परिसरातील नागरिकांनी आवश्यकतेनुसार मास्कचा वापर करावा, असे आवाहन केले.