नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करत गणेशमूर्ती विसर्जित करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:23 IST2021-09-13T04:23:35+5:302021-09-13T04:23:35+5:30
इचलकरंजी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करून व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार शहरात यंदाचा गणेशोत्सव साजरा होत ...

नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करत गणेशमूर्ती विसर्जित करावी
इचलकरंजी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करून व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार शहरात यंदाचा गणेशोत्सव साजरा होत आहे. मंगळवारी (दि. १४) घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यानुसार पालिकेने शहापूर खाणीसह शहरातील विविध ३० ठिकाणी कृत्रिम कुंडाचे नियोजन केले असून, पालिकेची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करत नियोजित ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जित करून शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यास प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी केले.
घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या अनुषंगाने प्रशासनाची श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात नगराध्यक्षा स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार व मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. शहापूर खण, कृत्रिम विसर्जन कुंड तसेच निर्माल्य कुंड असलेल्या सर्व ठिकाणी दोन शिप्टमध्ये जवळपास ४०० पूर्णवेळ अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
चौकटी
श्री गणेशमूर्ती विसर्जन कुंडाची ठिकाणे
गावचावडी जवळ-शहापूर, शहापूर चौक, एसटी आगार चौक, दत्तनगर चौक -दत्त मंदिर, गणेश नगर गल्ली नं. ४ कॉर्नर,विकास नगर चौक, मणेरे हायस्कूल चौक, स्टेशन रोड डेक्कन चौक, लिंबू चौक, सरस्वती हायस्कूल, छ. शाहू पुतळा, थोरात चौक, राधाकृष्ण चौक, विक्रमनगर , बिग बझार चौक, सांगली नाका, रिंग रोड चौक, महात्मा गांधी पुतळा, के. एल. मलाबादे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, संभाजी चौक, बंडगर माळ, मॉडर्न हायस्कूल जवळ, शाहू हायस्कूल रोड, हत्ती चौक , व्यंकोबा मैदान चौक, वैरण बाजार, षटकोन चौक, मरगुबाई मंदिर, राणाप्रताप चौक.
अशी असेल यंत्रणा
आरोग्य, बांधकाम, वाहन, प्राथमिक शिक्षण, आपत्कालीन व अतिक्रमण या विभागांचा समावेश आहे. त्याचबरोबर १५ आयशर टेम्पो, ६ डंपर, २ यांत्रिक बोटी, १ रुग्णवाहिका, १ अग्निशमन वाहन अशी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.