इचलकरंजीत दिवसभर नागरिकांची ये-जा सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:18 IST2021-06-04T04:18:58+5:302021-06-04T04:18:58+5:30
इचलकरंजी : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचा कालावधी १५ जूनपर्यंत वाढविला आहे. सकाळी सात ते ...

इचलकरंजीत दिवसभर नागरिकांची ये-जा सुरूच
इचलकरंजी : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचा कालावधी १५ जूनपर्यंत वाढविला आहे. सकाळी सात ते अकरा या वेळेत अत्यावश्यक सेवांची आस्थापना सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, अकरानंतरही नागरिक दिवसभर फिरत असल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असून, प्रशासन केवळ गांधारीची भूमिका घेत आहे.
शहर व परिसरात दररोज किमान ५० कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोनाला थोपविण्यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. परंतु त्यांचे प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहे. शहरातील मुख्य मार्ग व चौक वगळता अन्य ठिकाणी कारवाई शून्य आहे. अकरानंतर शहरात विनाकारण फिरण्यास बंदी आहे. तरीही नागरिक अंतर्गत रस्त्यावरून प्रवास करीत आहेत. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेकजण विनाकारण व विनामास्क फिरत आहेत. यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे; अन्यथा कोरोना संसर्ग रोखणे प्रशासनासमोर आव्हान ठरणार आहे.
चौकटी
कारवाईत सातत्य ठेवण्याची गरज
शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करण्यासाठी पथकाची नियुक्ती केली आहे. एक-दोन दिवसांच्या कारवाईनंतर पथकाची कारवाई थंडावते. त्यामुळे नागरिक पुन्हा शहरात बिनधास्त फिरत असतात. यामुळे पथकाने करवाईमध्ये सातत्य ठेवण्याची गरज असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
अशाने कोरोना संसर्ग थांबणार कसा?
प्रशासनाकडून विनाकारण फिरणा-यांची रॅपिड अँटिजन चाचणी केली जात असून, यामध्ये काहीजण पॉझिटिव्ह येत आहेत. शहरात फिरणारे चार ते पाचजण पॉझिटिव्ह आढळत असल्याने कोरोना संसर्ग वाढतच जाणार आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग थांबणार कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नागरिकांनाही खबरदारी घेण्याची गरज
प्रशासनाने केवळ सात ते अकरापर्यंत अत्यावश्यक खरेदीसाठी परवानगी दिली आहे. परंतु आस्थापना बंद झाल्यानंतरही विनाकारण अनेकजण फिरत असतात. केवळ आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडले पाहिजे. त्यामुळे आपली व आपल्या कुटुंबाची काळजीपोटी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.