कोगनोळी टोल नाक्याजवळ होणार वर्तुळाकार उड्डाणपुलाचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:24 IST2021-09-13T04:24:01+5:302021-09-13T04:24:01+5:30

कागल: येथील महामार्ग चौपदरीकरण आणि आरटीओ चेक पोष्ट नाका बांधणीसाठी पडलेल्या मोठ्या भरावामुळे कागल परिसरातील दुधगंगा नदी काठच्या गावांना ...

A circular flyover will be constructed near Kognoli Toll Naka | कोगनोळी टोल नाक्याजवळ होणार वर्तुळाकार उड्डाणपुलाचा घाट

कोगनोळी टोल नाक्याजवळ होणार वर्तुळाकार उड्डाणपुलाचा घाट

कागल: येथील महामार्ग चौपदरीकरण आणि आरटीओ चेक पोष्ट नाका बांधणीसाठी पडलेल्या मोठ्या भरावामुळे कागल परिसरातील दुधगंगा नदी काठच्या गावांना दरवर्षी महापुराला सामोरे जावे लागत असतानाच, आता कर्नाटक हद्दीत कोगनोळी टोल नाक्यापासून ते दुधगंगा नदीपर्यंत वर्तुळाकार उड्डाणपूल उभारण्याचा घाट घातला गेला आहे. महामार्गाला सोडून स्वतंत्र पद्धतीने हा उड्डाणपूल होणार असल्याने पुन्हा नवा भराव पडून करनुर, वंदुर ही गावे पाण्याखाली जाण्याचा धोका आहे, तसेच कोगनोळी गावच्या हद्दीतील तीस ते पस्तीस एकर पिकाऊ शेती जमिनीला आणि चाळीस ते पन्नास घरांना धोका होणार आहे. कोगनोळीसह कागल परीसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये या प्रकल्पामुळे अस्वस्थता पसरली आहे.

नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया ( NHAI) आणि कर्नाटक शासनाच्या वतीने हा उड्डाणपूल उभारण्यासाठी उपग्रह (सॅटेलाइट) सर्व्हे करण्यात आला आहे. जमीन संपादन करण्याची तयारी सुरू आहे. याची कुणकुण लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी नॅशनल हायवे अथोरिटीकडे तक्रारी केल्या आहेत, तर पराच्या धास्तीने कागल, करनुर वंदुर, शंकरवाडी, सिद्धनेर्ली आदी गावांतील ग्रामस्थ या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी कृती समिती गठीत करीत आहेत. सहापदरीकरण रस्ता आणि सर्व्हिस रस्ते यासाठी पुरेपूर जागा दोन्ही बाजूस शिल्लक असताना, कर्नाटक महाराष्ट्र सीमेला लागून हा उड्डाणपूल कशासाठी, हा प्रश्न समोर आला आहे.

...असा होणार आहे उड्डाणपूल

साधारणत: कोगनोळी गावाच्या ओढ्यापासून याची सुरुवात होईल आणि कोगनोळी फाट्यावर महामार्गावरून करनुरकडे जाणाऱ्या बाबासाहब पाणंद तेथून वळसा घालून, जयसिंग पवार यांच्या घराजवळून दुधगंगा नदीजवळ जाऊन महामार्गाला मिळणार आहे. कोगनोळीकडील बाजूस सरळ पूल आहे. यासाठी मोठे बांधकाम होणार आहे. सध्या साठ टक्के करनुर गाव महापुराने प्रभावीत होते. या प्रकल्पामुळे शंभर टक्के प्रभावीत होणार आहे.

या प्रकल्पास तीव्र विरोध करू...

वास्तविक कर्नाटक शासन आणि नॅशनल हायवे अथोरटी यांनी या प्रकल्पामुळे होणारे परिणाम अभ्यासायला हवे होते. दुधगंगा नदी क्षेत्रात अजून किती बांधकाम हे करणार आहेत. महामार्गावरून उड्डाणपूल करून या भागाचे मोठे नुकसान करीत आहेत. आम्ही लवकरच कृती समिती स्थापन करून अंदोलन छेडणार आहोत.

- बाळासाहेब पाटील, करनुर (शिवसेना कार्यकर्ते)

सध्या दूधगंगा नदीचे पाणी आमच्या घरातही येते. शेती पाण्याखाली जाते. आता नवीन उड्डाणपूल झाला, तर काय अवस्था होईल? शेतकरी वर्गाची पन्नास ते साठ एकर पिकाऊ जमीन या प्रकल्पामुळे बरबाद होणार आहे. अनेकांची घरे जाणार आहेत. कोणालाच विश्वासात घेतलेले नाही, अथवा सांगितले नाही. थेट कार्यवाही सुरू आहे.

सुनील माने. कोगनोळी, अमित पवार, करनुर (शेतकरी).

फोटो कोगनोळी टोल नाक्याजवळ होणाऱ्या संभावीत उड्डाणपुलाचा नकाशा.

Web Title: A circular flyover will be constructed near Kognoli Toll Naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.