‘सर्किट बेंच’प्रश्नी उद्या मेळावा
By Admin | Updated: December 4, 2014 00:46 IST2014-12-04T00:46:12+5:302014-12-04T00:46:12+5:30
आंदोलनाची दिशा ठरणार : सहा जिल्ह्यांतील वकिलांची उपस्थिती

‘सर्किट बेंच’प्रश्नी उद्या मेळावा
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन व्हावे, या मागणीसाठी सहा जिल्ह्यांतील वकिलांचा मेळावा शुक्रवारी (दि. ५) शाहू स्मारक भवन येथे दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात आंदोलनाची पुढील दिशा व महालोक अदालतवर बहिष्कार टाकण्यासंबंधी अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. विवेक घाटगे यांनी दिली.
बैठकीत उच्च न्यायालयाकडून सर्किट बेंचबाबत फक्त कागदी घोडे नाचविले जात आहेत. आपल्या कोर्टातील चेंडू दुसऱ्याच्या कोर्टात टाकून कृती समितीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे स्थगित केलेले आंदोलन पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्याचा निर्णय खंडपीठ कृती समितीने घेतला आहे. कृती समितीच्या निर्णयानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सहा जिल्ह्यांतील वकिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. १३ डिसेंबरच्या महालोकअदालतीवर वकिलांनी अलिप्त राहून बहिष्कार टाकण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे अॅड. घाटगे यांनी सांगितले. यावेळी अॅड. के. ए. कापसे, अॅड. शिवाजीराव राणे, आदी उपस्थित होते.