सर्किट बेंचसाठी प्रसाद जाधव ४२ किलोमीटर धावणार
By Admin | Updated: January 17, 2015 00:10 IST2015-01-16T22:21:43+5:302015-01-17T00:10:04+5:30
मुंबईत उद्या मॅरेथॉन स्पर्धा : गेल्यावर्षीही केली होती जनजागृती

सर्किट बेंचसाठी प्रसाद जाधव ४२ किलोमीटर धावणार
कोल्हापूर : कोल्हापूरला प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ व्हावे या मागणीसाठी मुंबईतील मॅरेथॉन स्पर्धेत उतरणार असून, तब्बल ४२ किलोमीटर धावणार आहे. पुन्हा एकदा ‘जर्नी फॉर जस्टिस’चा नारा देत रविवार (दि. १८) सकाळी सहा वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथून मॅरेथॉनला सुरुवात करणार असल्याची माहिती कोल्हापुरातील पक्षकार व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.जाधव म्हणाले, गेल्या २५-३० वर्षांपासून या प्रश्नासाठी कोल्हापूरसह रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्णांतील वकील बांधव लढा देत आहेत. गतवर्षी मुंबईतील मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो होतो, त्यावेळीही याप्रश्नी जनजागृती केली होती. मात्र, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी शासन सकारात्मक नसल्याचे दिसते. मॅरेथॉनचा प्रवास बांद्रा सी लिंक, वरळी व पुन्हा सीएसटी असा सुमारे ४२ किलोमीटरचा आहे. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे म्हणाले, सर्किट बेंचप्रश्नी वकील बांधव आंदोलन करीत आहेत. गतवर्षी ३१ जानेवारी २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी यावर निर्णय घेतो, असे सांगितले होते; पण अद्यापही या प्रश्नावर निर्णय झालेला नाही. पत्रकार परिषदेस माजी अध्यक्ष अॅड. शिवाजी राणे, सचिव अॅड. राजेंद्र मंडलिक यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)