पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविणारा मंडलिक पार्क

By Admin | Updated: May 24, 2016 01:00 IST2016-05-24T00:32:14+5:302016-05-24T01:00:45+5:30

‘वॉटर इंडिकेटर’द्वारे सूचना : गेल्या सात ते आठ वर्षांपासून पाण्याची बचत

Circle Park, which saves water drops and drops | पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविणारा मंडलिक पार्क

पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविणारा मंडलिक पार्क

प्रदीप पाटील --कोल्हापूर गतवर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे सर्वत्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी पाण्याचे महत्त्व प्रत्येकाच्या लक्षात येत आहे. शहरातील बहुतांश भागात नळाला पाणी आल्यानंतर घरावरील पाण्याची टाकी, हौदाकडे लक्ष न दिल्याने त्यामधून पाणी ओसंडून वाहत असते. यामुळे बऱ्याचवेळा पाण्याचा अपव्यय होतो. मात्र, काटकर माळ येथील मंडलिक पार्कमधील नागरिकांनी हा प्रकार गेल्या सात ते आठ वर्षांपासून थांबविला आहे. कारण या ठिकाणी पाण्याच्या टाकींवर टाकी भरल्यानंतर वाया जाणाऱ्या पाण्याची ‘वॉटर इंडिकेटर’ या उपकरणाद्वारे सूचना देणारे यंत्र बसविल्याने एक थेंबही पाणी वाया जाऊ देत नाहीत. दुष्काळ पडला म्हणूच पाणी बचत केले पाहिजे, असे न करता मंडलिक पार्क येथे राहणारे पराग केमकर यांनी पाणी बचतीचे महत्त्व येथील रहिवाशांना पटवून सांगितले. प्रथम त्यांनी पाण्याची टाकी, हौदांकडे लक्ष न दिल्याने ओसंडून वाहत असलेले पाणी थांबविण्यासाठी घरामध्ये तयार केलेल्या पाण्याच्या बझरद्वारे सूचना देणारे ‘वॉटर इंडिकेटर’ हे उपकरण येथील टाक्यांवर बसविले. त्यामुळे पाण्याची टाकी भरताच बझर वाजण्यास सुरुवात होते. त्यामुळे कॉलनीमधील नागरिक पाण्याचा नळ तत्काळ बंद करीत असल्याने गेल्या पाच वर्षांपासून या कॉलनीतील एक थेंबही पाणी वाया गेलेले नाही. या चांगल्या उपक्रमाची माहिती फक्त आपल्यापर्यंतच मर्यादित न ठेवता कॉलनीतील महिलांनी यासाठी विशेष करून पुढाकार घेतला आहे. त्यांनी आपल्या घरी येणारे नातेवाईक, मैत्रिणी यांना या उपाययोजनांबाबत माहिती देत त्यांची सध्या कशी गरज आहे. याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत.
उन्हाळा सुरु झाल्यानंतर कूपनलिकेला पाणी कमी येत होते. त्यामुळे अनेकांना उन्हाळ्यातच पाण्याचा टँकर मागवावा लागत होता. कॉलनीमध्ये कूपनलिकेचे पाणी काही दिवसांपासून कशामुळे कमी होत आहे, याचा अभ्यास केमकर यांनी केला. त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की, कॉलनीच्या परिसरात काही वर्षांपासून रस्त्यांचे डांबरीकरण तसेच बांधकाम झाल्याने पाणी जमिनीत मुरतच नाही. त्यामुळे कूपनलिकेला पाणी कमी येत आहे. त्यामुळे प्रथम सर्व इमारतींचे पावसाचे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे जमिनीत मुरविण्यास सुरुवात केली. त्याचा इतका फायदा झाला की, कूपनलिकेचे पाणी वाढले आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून मंडलिक पार्क टँकरमुक्त झाला आहे, असेही म्हणता येईल.

कॉलनीत पाण्याची टाकी भरल्यानंतर अनेकवेळा पाणी वाया जात असल्याने हजारो लिटर पाणी वाया जात होते. यासाठी आम्ही कॉलनीत प्रत्येक पाण्याच्या टाकीवर वॉटर इंडिकेटर बसविले आहे. त्यामुळे पाण्याची बचत करता आली तसेच वेळ आणि विजेचीही बचत होत आहे.
- पराग केमकर

Web Title: Circle Park, which saves water drops and drops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.