सिनेमाची मोहिनी
By Admin | Updated: December 21, 2015 00:28 IST2015-12-21T00:12:40+5:302015-12-21T00:28:49+5:30
गिसेपी टोरेन्टोर या प्रसिद्ध इटालियन दिग्दर्शकाचे यंदा ‘डिरेक्टर फोकस’मधून पुनरावलोकन घडणार आहे.

सिनेमाची मोहिनी
कधी कधी नोस्टॅल्जियासाठी नोस्टॅल्जिया म्हणून बालगंधर्व घडतो. पटकथाकारास बालगंधर्वांना माणूस म्हणून समजून घेण्यापेक्षा त्यांची प्रतिमाच गडद करण्यात स्वारस्य, तर कधी नोस्टॅल्जियाच्या निमित्ताने अबोध मनातील मुस्लिम द्वेषभाव सक्रिय होत. मुळात संगीत घराण्यासंदर्भातील कट्यार.. मुस्लिम धर्म अधोरेखित करत नकारात्मक व्यक्तिरेखा एकात्मतेच्या काळजात घुसवली जाते. या पार्श्वभूमीवर सिनेमा पॅरेडिझोमधील सूर खऱ्या अर्थाने निरागस होत.
गिसेपी टोरेन्टोर या प्रसिद्ध इटालियन दिग्दर्शकाचे यंदा ‘डिरेक्टर फोकस’मधून पुनरावलोकन घडणार आहे. त्या निमित्ताने ‘सी एव्हरीथिंग..’ ‘आपण जर आपल्याला आवडतात त्याच पद्धतीचे सिनेमे पाहत राहू, तर आपल्याला संवेदनक्षमतेचा संकोच होत राहील,’ असं गिसेपी म्हणतो; कारण त्याने दिग्दर्शक बनण्यापूर्वी प्रोजेक्शनिस्ट म्हणून काम केले होते. चित्रपट कोणत्याही दर्जाचा असो; एक चांगला प्रोजेक्शनिस्ट हा पडद्यावर चांगल्यात चांगली दृृक्प्रतिमा आणि ध्वनी उपलब्ध करून देण्याच्या प्रयासात असतो.
तेव्हा आपल्या ‘सिनेमा पॅरेडिझो’ (१९८८) या दुसऱ्याच कलाकृतीमधून स्वत:चा आल्टरइगो असणाऱ्या टोटो या व्यक्तिरेखेसह मग प्रेक्षकही आपापल्या मनात दडलेल्या टोटोस भेटतात, नोस्टॅल्जिक होतात. रोममध्ये राहणाऱ्या साल्व्हॉटॉर (टोटो) या यशस्वी दिग्दर्शकाला त्याची मैत्रीण कोणी आल्फ्रेदो मेल्याची वार्ता कळवते. फ्लॅशबॅक.. विधवापुत्र टोटोस गावातील ‘सिनेमा पॅरेडिझो’ सिनेमागृहाबद्दल आकर्षण असते. प्रोजेक्टर रूम बद्दल तर विशेष आकर्षण असते. सुरुवातीस आतही न घेणाऱ्या अल्फ्रेदोबरोबर त्याची हळूहळू मैत्री होते. प्रत्येक चित्रपट प्रथम धर्मगुरू पाहत असतो. चुंबन-आलिंगनांच्या दृश्यांना कात्री लावत असतो. हे सेन्सॉर्ड फुटेज टोटोसाठी जंगी आकर्षणच असते. तर ‘नायक नायिका जवळ येता-येता जंपकट घेत दूरवर उभे असलेले चेहऱ्यावर गर्भित भाव असलेले ते’ पाहून प्रेक्षकांचा मात्र त्रागा! देश-काळ बदलला तरी हा सेन्सॉरबाह्य सेन्सॉरशिपचा जाच सहन करावा लागतोच!
एकदा तिकीट न मिळालेले निराश प्रेक्षक पाहून अल्फ्रेदो तांत्रिक क्लृप्ती करत रजतपटाबरोबरच चौकातील भिंतीवरही फोकस पाडत बाहेरील लोकांनाही चित्रपट दाखवितो. असा अल्फ्रेदो टोटोसाठी गुरुतुल्यही! अचानक अपघातील आगीत पॅरेडिसो भस्मसात होते, अल्फ्रोदो अंध होतो. नुतनीकरण झाल्यावर टोटोला प्रोजेक्शनिस्ट म्हणून काम मिळते. तो छंद म्हणून लघुपटही बनवू लागतो. यातूनच एलेनाच्या प्रेमात पडतो. मात्र तिच्या श्रीमंत बापाचा विरोध. दरम्यान लष्करीसेवेतून टोटो परततो तेव्हा त्याचा जीव पॅरेडिझो, अल्फ्रेदो व एलेनात अडकलेला असतो. यातून तो बाहेर पडला नाही, तर उज्ज्वल भविष्यास मर्यादा पडतील, हे ध्यानी आल्यामुळे अल्फ्रेदो टोटोस कठोर निग्रहाने पुन्हा परत कधी न येण्याच्या वचनासह शहरात पाठवितो.
आता अंत्यदर्शनासाठी आलेल्या टोटोला पॅरेडिझोही जमीनदोस्त होणार असल्याचे कळते. योगायोगाने विवाहित एलेनाचीही गाठ पडते. त्यावेळी टोटोच्या भविष्यासाठी प्रेमबंधन अडथळा ठरू नये म्हणून अल्फ्रेदोनेच एलेनास प्रतिसाद न देण्याची विनंती केलेली असते, हेही कळते. अल्फ्रेदोची बायको टोटोस भेटते तेव्हा जरी अल्फ्रेदो प्रत्यक्ष भेटला नाही तरी तुझ्या कारकिर्दीवर त्याची सतत नजर होती, असे सांगून त्याच्यासाठी ठेवलेली भेट देते, ती म्हणजे सेन्सॉटड फुटेजमधून संकलित चुंबनलिंगन फिल्म. ती पाहत असताना डोळ््यातील अश्रूंमध्ये एक संपूर्ण साक्षात्कार प्रेक्षकांनाही होतो. गिसेपीचे ‘अ प्युअर फॉर्मेलिटी’ (१९९३), ‘द बेस्ट आॅफर’ (२०१३) ह्याही पॅकेजमध्ये उपलब्ध.
किफनामा
डॉ. अनमोल कोठाडिया