यावर्षी प्रथमच ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. या आरक्षण सोडतीनंतर अनेक गावांत सरपंच पदाचे दावेदार ठरले आहेत, तर सर्वसाधारण जागेवर सरपंच पदासाठी मोठी चुरस होणार आहे. याठिकाणी सरपंच पदाचा फॉर्म्युला ठरणार आहे. १३ जण सर्वसाधारण प्रवर्गातून सरपंच होणार आहेत. दरम्यान, सरपंच, उपसरपंच निवडीच्या तारखेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
बुधवारी शिरोळ तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत झाली. अनेकांचा हिरमोड आरक्षणामुळे झाला असून खुल्या आरक्षण पडलेल्या गावात सदस्यांचा उत्साह वाढला आहे. यामध्ये नुकत्याच झालेल्या ३३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच निवडी होणार आहेत. त्यामुळे सरपंच पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
चौकट - संवेदनशील गावे झाली सर्वसाधारण
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावे सर्वसाधारण व सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने सरपंच पदासाठी मोठी चुरस होणार आहे. कोथळी, उदगांव, यड्राव, गणेशवाडी, अर्जुनवाड, तेरवाड, आदी गावांत खुले आरक्षण आहे.
चौकट - फोडाफोडी सुरू
सरपंच पदाची लॉटरी जाहीर होताच सदस्य फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे पॅनलला दगाफटका होऊ नये यासाठी काही गावांतील गावपुढाऱ्यांकडून सहलीचे नियोजन केले जात आहे. काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीत मोठी गोची निर्माण झाली आहे. त्यामुळे आपापल्या सदस्यांवर आघाडीचे नेते लक्ष ठेवून आहेत.
चौकट - अल्पमतातील आघाडीकडे सरपंच पद जाणार
जैनापूर येथे अल्पमतात असलेल्या सत्ताधारी गटाकडे सरपंच पद जाणार आहे. विरोधकांनी सत्तांतर करून नऊपैकी पाच जागा जिंकल्या होत्या. मात्र, अनुसूचित जाती महिला सरपंच पदाचा सदस्य या गटाकडे नाही. त्रिशंकू असलेल्या दत्तवाड येथे यड्रावकर गट नूर काले पॅनलचा सरपंच होणार आहे. घोसरवाड येथे चार सदस्य असलेल्या सरकार पॅनलचा सरपंच होणार आहे. त्रिशंकू असलेल्या शिरदवाडमध्ये स्वाभिमानी ग्रामविकास आघाडीला सरपंच पदाचा मान मिळण्याची शक्यता आहे.