‘चौंडेश्वरी’ पुण्याच्या जनता बॅँकेत विलीन
By Admin | Updated: June 6, 2016 01:11 IST2016-06-06T01:08:03+5:302016-06-06T01:11:00+5:30
सहकार खात्याची मंजुरी : सातही शाखांमध्ये ‘जनता’चे व्यवस्थापक आज रूजू होणार

‘चौंडेश्वरी’ पुण्याच्या जनता बॅँकेत विलीन
इचलकरंजी : येथील चौंडेश्वरी सहकारी बँक पुणेस्थित जनता सहकारी बँकेत विलीन करण्यास सहकार खात्याने मंजुरी दिली आहे. बॅँक विलीनीकरणासाठी ४ जुलै ही तारीख देण्यात आली असली तरी आज, सोमवारी चौंडेश्वरी बँकेच्या सातही शाखांकडे व्यवस्थापक रूजू होत असल्याचे जनता बॅँकेने ‘चौंडेश्वरी’ला कळविले आहे.
देवांग कोष्टी समाजाची चौंडेश्वरी बॅँक समजली जात असून या बॅँकेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर, सांगली व सातारा असे तीन जिल्ह्यांत आहे. एकूण सात शाखांमार्फत बॅँक कार्यरत आहे. बॅँकेवर साधारणत: दोन वर्षांपूर्वी आर्थिक निर्बंध लावण्यात आले, त्यावेळी वीस कोटींच्या ठेवी आणि चौदा कोटी रुपयांचा संचित तोटा होता. बॅँक चालू असताना काही महाभागांनी घेतलेले कर्ज थकवले आणि न्यायालयाच्या चक्रात बॅँक अडकल्याने बॅँक नुकसानीत गेली.
अशाप्रकारे एकेकाळी नावाजलेल्या चौंडेश्वरी बॅँकेला रिझर्व्ह बॅँकेने ३० आॅगस्ट २०१४ रोजी मोडॅटोरियम पिरीयड लागू केला. बॅँकेवर तेव्हापासून आर्थिक निर्बंध आहेत. दरम्यानच्या काळात समृद्धी को-आॅप. क्रेडिट सोसायटीने चौंडेश्वरी बॅँकेत त्यांची पतसंस्था विलीन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बारगळला. दरम्यान, पुणे येथील जनता सहकारी बॅँकेने विलीन करण्याचा प्रस्ताव दिला. त्याप्रमाणे एक वर्षापूर्वी पुणे जनता सहकारी बॅँकेच्या सर्वसाधारण सभेत चौंडेश्वरी बॅँक विलीन करून घेण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला. त्यानंतर चौंडेश्वरी सहकारी बॅँकेच्या सर्वसाधारण सभेत चौंडेश्वरी बॅँक जनता बॅँकेत विलीन करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला आणि पुढे ही प्रक्रिया सुरू झाली.
दरम्यानच्या काळात डिसेंबर २०१५ व जानेवारी २०१६ मध्ये चौंडेश्वरी बॅँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. संचालक मंडळाच्या पंधरा जागांसाठी पंधरा उमेदवारच निवडणूक रिंगणात उभे राहिले. म्हणून (पान १० वर)
पुनर्विचार करण्यासाठी १० जूनला विशेष सभा
दरम्यान, पुण्यातील जनता सहकारी बॅँकेत विलीन होण्यासाठी पुनर्विचार करण्यास चौंडेश्वरी बॅँकेच्या सभासदांची १० जूनला विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे या बॅँकेच्या विलीनीकरणाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले असल्याची चर्चा आहे.