कुंभोजमध्ये मद्यपींना चोप
By Admin | Updated: July 10, 2017 00:32 IST2017-07-10T00:32:42+5:302017-07-10T00:32:42+5:30
कुंभोजमध्ये मद्यपींना चोप

कुंभोजमध्ये मद्यपींना चोप
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभोज : कुंभोजमध्ये गावठी दारू विक्रीविरोधात सुरू झालेल्या लढ्यातील रणरागिणींच्या आक्रमक पवित्र्यामुळे कुंभोज, हिंगणगावातील दारू अड्डेचालकांनी धास्ती घेतली आहे. उघडपणे दारूविक्री बंद असली तरी काही ठिकाणी चोरून विक्री सुरूच असल्याने रविवारी सायंकाळी आंदोलक महिलांनी गावातून फेरी काढून संपूर्ण दारूबंदीचा एल्गार केला. तर सकाळी सहा मद्यपींना आंदोलक महिलांनी चोप दिला. त्यामुळे मद्यपींनीही दारूबंदी लढ्याचा धसका घेतला आहे.
कुंभोजमध्ये दोन दिवसांपासून दारूबंदीसाठी सुरू असलेल्या लढ्यादरम्यान पहिल्या दिवशी माजी सरपंच कमल सुवासे, रुपाली घाटगे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजातील बहुसंख्य महिलांनी चार दारूअड्डे उद्ध्वस्त केले.त्यांनतर पोलिसांनी दोन दारू अड्डेचालकांवर कारवाई केली.
दरम्यान, रविवारी सकाळी कुंभोजमध्ये सहा मद्यपींना आंदोलक महिलांनी चोप दिला. पोलिसांची कारवाई, महिलांच्या धास्तीने उघडपणे दारू विक्री बंद झाली असली तरी चोरून दारू विक्री सुरू असल्याची खात्री झाल्याने संतापलेल्या दीडशेहून अधिक महिलांनी रविवारी सायंकाळी गावातून फेरी काढून दारूबंदी झालीच पाहिजे, उभी बाटली आडवी झालीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. फेरीत माजी सरपंच कमल सुवासे, रूपाली पुजारी, आक्काताई सुवासे, रूपाली घाटगे, उज्ज्वला घाटगे, कमल घाटगे, बयाबाई घाटगे, माया गुजरे, रूबिका भोरे, आक्काताई घाटगे, मीना घाटगे, राजू घाटगे, विजय सुवासे, जानका घाटगे आदी सहभागी झाल्या होत्या.
...अन् हिंगणगावातील दारुविक्रेते पळाले
कुंभोज येथील गावठी दारू अड्डे महिलांनी फोडल्यामुळे कुंभोजमधील मद्यपी हिंगणगावमध्ये जात होते. त्यामुळे संतापलेल्या कुंभोजच्या रणरागिणींनी शनिवारी रात्री नऊ वाजता हिंगणगाव (ता. हातकणंगले) येथील दारूअड्ड्यावर चाल केली. मात्र, विके्रत्यांना याची कुणकुण लागताच त्यांनी दारुअड्ड्यांना कुलूप ठोकून तेथून पळ काढला. हातात दांडकी घेऊन अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या इराद्याने गेलेल्या महिलांनी अड्ड्यांसमोर तासभर बैठक मारली. काही ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी दोन्हीही गावठी दारू अड्डेचालकांना समज देऊ, असे आश्वासन दिल्याने आंदोलक महिलांनी अकरा वाजता हिंगणगाव सोडले. जाताना त्यांनी पुन्हा दारूअड्डे सुरू झाले की त्यांची गय केली जाणार नाही, आम्ही ते अड्डे उद्ध्वस्त करू, असा इशाराही त्यांनी दिला. यात आक्काताई घाटगे, मंगल आवळे, उज्वला घाटगे, सुरेखा सुवासे, अनिता घाटगे, शालन लोंढे, शोभा घाटगे, सुमन भोरे, लता पांढरे, रुक्काबाई घाटगे, जानका घाटगे, हिराबाई घाटगे, सुमन सुवासे, शालन सुवासे, छाया लोंढे, मंगल घाटगे, कमल घाटगे, छाया सकटे, रूपाली घाटगे, ताराबाई कांबळे, आदी सहभागी झाल्या होत्या.
दारूबंदी लढ्यात ग्रामपंचायत मागे का?
आंदोलक महिलांनी दारुअड्डे उद्ध्वस्त करून शुक्रवारी पाठिंब्यासाठी ग्रामपंचायतीत ठिय्या मारला होता. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दारूबंदी लढ्यात आम्ही यापुढे सहकुटुंब तुमच्या सोबत असू ,असे सांगितले होते. असे असताना केवळ माजी सरपंच, सदस्या रूपाली पुजारी वगळता कोणी पदाधिकारी फेरीत सहभागी झाले नाही. ग्रामपंचायत सदस्य कलगोंडा पाटील, जहाँगीर हजरत, माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळे हे फेरीदरम्यान उपस्थित होते. मात्र, ते फेरीत सहभागी झाले नाहीत. यावरून संतप्त बनलेल्या आंदोलक कमल सुवासे यांनी ग्रामपंचायत दारूबंदी लढ्यात मागे का? असा सवाल केला.