‘कुंभी’ची निवडणूक लावा, अन्यथा उपोषण
By Admin | Updated: July 14, 2015 23:55 IST2015-07-14T23:55:16+5:302015-07-14T23:55:16+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कुंभी-कासारी बचाव मंचचा इशारा

‘कुंभी’ची निवडणूक लावा, अन्यथा उपोषण
कोल्हापूर : संचालक मंडळाची मुदत संपलेल्या कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक उद्या, गुरुवारपर्यंत जाहीर न झाल्यास शुक्रवारी (दि. १७) कारखान्याचे सभासद उपोषणाला बसतील, असा इशारा कुंभी-कासारी बचाव मंचने दिला आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना भेटून कारखान्याच्या सभासदांनी यासंदर्भात निवेदन दिले.
कुंभी-कासारी बचाव मंचचे एक शिष्टमंडळ मंगळवारी जिल्हाधिकारी सैनी यांना भेटले. कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत जानेवारी २०१५ मध्ये संपली आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, यासाठी काही सभासद सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्याचा परिणाम म्हणून कारखान्याची पक्की सभासद यादी १९ जूनला प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुुळे २८ जूनपर्यंत तारीखवार निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे आवश्यक होते, पण त्याप्रमाणे कार्यवाही झालेली नाही. अनेकवेळा मागणी करूनही शासकीय अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहेत.
निवडणूक कार्यक्रम जाहीर न करण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेमुळे सभासदांच्या न्याय हक्कांना महत्त्व दिले जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे जर उद्यापर्यंत कार्यक्रम जाहीर केला नाही, तर मात्र दुसऱ्याच दिवसापासून उपोषण करावे लागेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांना भेटलेल्या शिष्टमंडळात बाजीराव खाडे, कृष्णात पाटील, संजय पाटील, संजय जोतिराम पाटील, कृष्णात चाबुक, सज्जन पाटील, बाजीराव पाटील, पोपट पाटील, स्वरूप पाटील, प्रल्हाद मर्दाने, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)