चौंडेश्वरी बँकेची निवडणूक बिनविरोध
By Admin | Updated: December 21, 2015 00:56 IST2015-12-20T21:52:42+5:302015-12-21T00:56:14+5:30
१५ संचालकांसाठी १५ उमेदवार : १६ हजार सभासद, बँकेचे नऊ शाखांतून कामकाज

चौंडेश्वरी बँकेची निवडणूक बिनविरोध
इचलकरंजी : येथील चौंडेश्वरी सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, निवडणुकीसाठी असलेल्या १५ संचालकांच्या जागांसाठी १५ उमेदवारांनीच अर्ज दाखल केल्याने त्यांची निवड बिनविरोध मानली जात आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांत सभासद व कार्यक्षेत्र असलेल्या बॅँकेची निवडणूक बिनविरोध होत असल्याचे वेगळेपण मानले जात आहे.साधारणत: २५ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या चौंडेश्वरी सहकारी बॅँकेकडे १६ हजार सभासद आहेत. हे सभासद इचलकरंजी, सांगली, कोल्हापूर, गडहिंग्लज व कऱ्हाड या परिसरात विखुरलेले आहेत. त्याचप्रमाणे बॅँकेच्या इचलकरंजी येथे तीन, कोल्हापूर, गांधीनगर, जयसिंगपूर, सांगली, कऱ्हाड व गडहिंग्लज याठिकाणी प्रत्येकी एक अशा, नऊ शाखा आहेत. याशिवाय इचलकरंजीतील अण्णा रामगोंडा शाळासमोरील भाजी मार्केटमध्ये विस्तारित कक्ष आहे. बॅँकेकडील सभासदांच्या ठेवी २० कोटी रुपयांच्या असून, बॅँक थकीत कर्जदारांमुळे नुकसानीत गेली आहे. बॅँकेला १४ कोटी रुपयांचा संचित तोटा आहे.
अशा या बॅँकेला मागील वर्षी रिझर्व्ह बॅँकेने सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध घातले होते. त्याचा कालावधी सप्टेंबर महिन्यात संपला असून, हे निर्बंध रिझर्व्ह बॅँकेने आणखीन सहा महिन्यांनी वाढविले आहे. दरम्यानच्या काळात समृद्धी को-आॅप. क्रेडिट सोसायटीने या बॅँकेमध्ये आपली पतसंस्था विलीन करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, तो कालांतराने स्थगित झाला. आता पुणे स्थित जनता सहकारी बॅँकेने चौंडेश्वरी बॅँक विलीन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.पुणे येथील जनता सहकारी बॅँकेमध्ये चौंडेश्वरी बॅँकेचे विलीनीकरण करण्याच्यादृष्टीने जनता बॅँकेच्या जुलै महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत चौंडेश्वरी बॅँक विलीन करून घेण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आला. त्यानंतर चौंडेश्वरी बॅँकेच्या आॅगस्ट महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये जनता बॅँकेमध्ये ‘चौंडेश्वरी’ विलीन करून घेण्यासाठी मंजुरी देण्यात आली. त्याप्रमाणे रिझर्व्ह बॅँक व सहकार खात्याला कळविण्यात आले आहे. सहकार खात्याने या प्रस्तावास मंजुरी दिली असून, आता रिझर्व्ह बॅँकेच्या मंजुरीच्या मार्गप्रतीक्षेत दोन्ही बॅँका आहेत.दरम्यान, चौंडेश्वरी बॅँकेच्या संचालक मंडळाची मुदत जून २०१५ मध्ये संपल्यामुळे निवडणूक घेण्यासाठी शासनाने नेमलेल्या प्राधिकरणाने चौंडेश्वरी बॅँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. चौंडेश्वरी बॅँकेच्या संचालक मंडळावर सर्वसाधारण गटाचे दहा, अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी एक, भटक्या विमुक्त जाती/विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी एक, इतर मागास प्रतिनिधी एक व महिला प्रतिनिधी दोन, असे एकूण पंधराजणांना निवडून देण्याचे आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १९ डिसेंबर होती. तर अर्जांची छाननी २१ डिसेंबर, उमेदवारी अर्ज मागे घेणे ५ जानेवारी २०१६, मतदानाची तारीख १७ जानेवारी आणि १८ जानेवारीला मतमोजणी व निकाल असा निवडणूक कार्यक्रम आहे. (प्रतिनिधी)
नवनिर्वाचित १५ संचालक
चौंडेश्वरी बॅँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १९ डिसेंबर असताना त्या तारखेअखेर सर्वसाधारण गटामध्ये दहा, तर भटक्या विमुक्त, अनुसूचित जाती/जमाती, इतर मागास या गटांमध्ये प्रत्येकी एक आणि महिला आरक्षित गटामध्ये दोन असे एकूण १५ अर्ज दाखल झाले.
त्यामध्ये विठ्ठलराव डाके, श्यामसुंदर मर्दा, राधेश्याम चांडक, सुरेशकुमार राठी, तुकाराम वाघ, भवरीलाल कांकरीया, प्रसाद पवार, संजय आडगावकर, अभिजित बेडके, शिरीष देशपांडे, अजयसिंह सिंगर, मनीषा साळवी, अनुराधा कुंभार, गीता कुलकर्णी व ज्योती सांगले यांचा समावेश आहे.
संचालकांच्या आवश्यक १५ जागांसाठी १५ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिल्यामुळे बॅँकेची निवडणूक बिनविरोध झाल्याचे सांगण्यात येते.